कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ४०० जागा जिंकण्याचा इरादा व्यक्त केला जात असल्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वच जागा जिंकणार असे सांगावे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी कोल्हापुरात केली. तसेच मराठा आरक्षण विधेयकावर त्यांनी भाष्य केले.

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत संमत झाले असले तरी ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याची शंका आहे. याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे मत शरद पवार यांनी येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा – कोल्हापूर: लाच स्वीकारल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार जाळ्यात

पवार म्हणाले, राज्यात आमचे शासन असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, उच्च न्यायालयाने त्याविरोधात निकाल दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस शासन काळात दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले पण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले. विद्यमान शासनाने तोच मसुदा जसाच्या तसा घेतला असून त्याचा प्रस्ताव विधानसभेने मान्य केला आहे. या विधेयकाला सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला आहे. आता या आरक्षणाचे सर्वोच्च न्यायलयात काय होईल यावर सगळे भविष्य अवलंबून आहे. त्याबद्दल आज काही सांगता येणार नाही. परंतु या विधेयकांवरील यापूर्वीचे निकाल अनुकूल नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात विस्तार करण्यावर अजित पवारांचा भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीची चर्चा असून त्याचसाठी आज त्यांची भेट घेत आहात का, अशी विचारणा केली असता पवार यांनी हा माझा एकट्याचा निर्णय नसतो. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना व काँग्रेस या घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पण ते उमेदवार असतील तर मला व्यक्तिशः आवडेल, असे त्यांनी सांगितले.