शिवसेना-भाजप यांची युती तुटल्याचा धोका राज्य शासनाला नाही. शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही. भाजप- शिवसेना हे नसíगक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. दोन्ही पक्षांकडून   आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार, असे ते म्हणाले .

शिवसेना-भाजप यांची तुटलेली  युती आणि त्यामुळे बदललेले संदर्भ याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी मुंबई महापालिकेत ११५ जागा जिंकून भाजपचाच महापौर होणार, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही स्वतंत्र लढू की कसेही महापौर आमचाच होणार. तो स्वबळावरही असेल आणि दोघे एकत्र आलो तरीही, असे ते म्हणाले . मुंबईत युती तुटली असेल तरी उर्वरित महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांचं उद्धव ठाकरे यांना  केले. उभयतांकडून इतकी जहरी टीका करू नये की ज्यामुळे पुन्हा एकत्र येताना अडचणी येतील, असा सबुरीचा सल्ला त्यांनी तोंड सोडलेल्या नेत्यांना दिला.

शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेचे अवलोकन करता भाजपाला शासन चालवण्यासाठी राष्ट्रवादीची गरज लागेल का, या प्रश्नावर त्यांनी राज्य शासन पूर्ण पाच वष्रे चालणार असल्याचा विश्वास व्यक्त करून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीला इलेक्टिव्ह मेरिट पाहून उमेदवारी देणार, असल्याचे सांगतानाच पाटील यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे. तथापि, गुन्हेगारी वृत्तीचा विचार भाजपमध्ये होणार नाही, असे निक्षून सांगितले. सेना-मनसेची युतीची चर्चा हा राजकीय स्वाभाविक भाग असल्याचे ते म्हणाले.

स्वाभिमानीचा नकार             

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानीला सोबत घेण्याचे प्रयत्न केले पण त्यांनी भाजपसोबत येण्यास नकार दिला आहे. स्वाभिमानी सोबत न आल्याचे दुख वाटत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.