महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जाहीर केलेल्या दुस-या यादीत सक्षम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे मुलाखतीला न येता किंवा साधी उमेदवारी मागणी अर्ज न करणा-यांची व नाहक आरोप करणा-यांची लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे बंडखोरीचे आव्हान देणारे ‘खरे शिवसनिक’ नाहीतच, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
तटाकडील तालीम प्रभाग आणि दुधाळी पॅव्हेलियन या प्रभागांतून उमेदवारी डावलल्यामुळे अनुक्रमे रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, तसेच सतीश ढवळे आणि नितीन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून शिवसेनेत बंडखोरी करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले होते. त्या पाश्र्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी हे पत्रक प्रसिद्धीस देत हकालपट्टी करणार असल्याचे जाहीर केले.
शहरप्रमुख शिवाजी जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेवर शिवसेना एकहाती सत्ता आणणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्या या सर्वसमावेशक आहेत; पण काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बंडखोरीची भाषा करून पत्रकबाजी करणा-यांनी, तसेच शिवसेनेविरोधात जनतेमध्ये गरसमज पसरविणा-यांनी आत्मपरीक्षण करावे, असाही सल्ला देण्यात आला आहे.
प्रभाग क्र. ५३ या दुधाळी पॅव्हेलियन या विभागातून बंडखोरीची भाषा करणा-यानी गेल्या दहा वर्षांत पक्षहिताचे कोणते काम केले, याचा विचार करावा. नितीन पाटील, सतीश ढवळे यांनी उमेदवारी मिळण्याकरिता रितसर अर्ज केला नव्हता. त्यांनी मुलाखतीवेळीही उपस्थिती दाखविली नव्हती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena second list announced
First published on: 06-10-2015 at 03:30 IST