दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा आणि अडीच वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सत्तारूढ भाजपने आत्तापासूनच सुरू केली आहे. केंद्रात व राज्यात किती जागांवर विजय मिळवायचा याचे लक्ष्य येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य मंत्रिमंडळात द्वितीय स्थानी असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र, पालकमंत्री पाटील यांना हे लक्ष्य गाठण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ात शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या सत्तेतील मित्रपक्षांना प्रामुख्याने चितपट करावे लागणार आहे. सध्याच्या संख्याबळाच्या लोकसभेला दोनशे पट तर विधानसभेला तिप्पट यश मिळवण्याचे कडवे आव्हान ‘दादां’समोर या निमित्ताने ठाकले आहे, तर याच वेळी शिवसेनेने लोकसभेची एक जागा आणि विधानसभेच्या दोन जागा अधिक मिळवण्याचा इरादा व्यक्त करत पालकमंत्र्यांचे आव्हान पेलण्यासाठी शड्ड ठोकला असल्याने आत्तापासूनच आगामी निवडणुकांचे रणांगण तापू लागले आहे.

कोल्हापुरात झालेल्या मेळाव्यात तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला किती मोठी हनुमान उडी घ्यायची आहे हे स्पष्टपणे सांगितले. लोकसभेत भाजपचे संख्याबळ जिल्ह्य़ातील दोन्ही जागांसह ४०० करायचे आहे, तर विधानसभेत पक्षाचे सदस्य १७० कसे होतील याचे नियोजन करायचे आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात सहा ते सात आमदार विजयी करायचे आहेत, असे सांगत पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला.

भाजपचे वाढते बळ आणि आव्हान

कोल्हापूर महापालिका व विधान परिषद निवडणुकीत भाजपला यशाने हुलकावणी दिली. मात्र, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा वाढता प्रभाव दिसून आला. अर्थात या दोन्ही यशाला पालकमंत्री पाटील यांचे नियोजन आणि उभय काँग्रेसमधील आयारामांची कुमक कारणीभूत ठरली.लोकसभेच्या दोन्ही जागांपकी एकही जागा सध्या भाजपकडे नाही. नाही म्हणायला छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा सदस्य बनवण्यात आले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक तर हातकणंगलेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात.  महाडिक हे लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री बनतील, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करून जणू त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीही जागा जिंकण्याचा इरादा व्यक्त करत शेट्टी यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.

विधानसभेत भाजपचे सुरेश हाळवणकर व अमल  महाडिक हे दोन सदस्य आहेत. आव्हान सेनेसमोरचे कागदोपत्री आजही सेना जिल्ह्य़ात संख्याबळात  वरचढ असली तरी हाच आलेख उंचावता ठेवणे हे आव्हान शिवसेनेसमोर आहे.  गटबाजीने पक्षाची ताकद कमकुवत होत आहे. सेनेत नव्याने आलेले अजूनही पक्षाशी एकरूप झाले नाहीत. त्यांचा एक पाय मूळ विचारधारेशी जुळला आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने दोनदा निवडून आलेले तिन्ही आमदार नाराज असून त्यांच्यात मंत्रिपद मिळवण्याच्या स्पध्रेतून कटुता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे भाजपने फेकलेल्या जाळ्यात किती आमदार गळाला लागणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संख्याबळ वाढणे राहिले बाजूलाच उलट गळती रोखणे हेच नेतृत्वासमोरचे आव्हान असणार आहे. त्यामुळेच सेनेच्या मेळाव्यात वारंवार शिवसनिकांना ‘शिवसेना सोडण्याचा विचार करू नका, जाणार असाल तर आत्ताच जा, पण इतिहासाकडे वळून बघा,’ असा विनवणीचा सूर आळवावा लागला. तो बरेच काही सांगून जाणारा ठरला. भाजपच्या मदतीने लोकसभेत दुसऱ्यांदा गेलेल्या  राजू शेट्टी यांचा मार्ग आता भाजपच रोखणार असे दिसत आहे.

शिवसेनाही आक्रमक

पालकमंत्री पाटील यांनी संख्याबळ वाढवण्याचा इरादा व्यक्त केल्यावर लगेचच शिवसेनेच्या छावणीतून प्रतिकाराचे शाब्दिक हल्ले सुरू झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘गेल्या विधानसभेला शिवसेनेने जिल्ह्य़ातील ताकद दाखवून दिली आहे. आजही आम्ही कोणापेक्षा कमी नाही. शिवसेना येथे रुजली आहे,’ असे म्हणत सेनेच्या वाढत्या शक्तीकडे अंगुलीनिर्देश केला. तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्तेच्या ‘दादा’गिरीने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असली तरी ते शिवसेनेला संपवण्याच्या नादात स्वत:च संपतील, असे मत व्यक्त केले.

दोन्ही काँग्रेसची कसोटी  : अपयश, गळती, पक्षीय मतभेदाची दरी अशा प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी या मुख्य विरोधी पक्षांची आगामी निवडणुकांत कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व काँग्रेसचे सतेज पाटील या आमदारद्वयींमध्येच काय ती लढण्याची खुमखुमी दिसते. बाकीचे स्थानिक नेते पक्षाशी नाते सांगण्यापुरते चिकटून आहेत इतकेच. अशा स्थितीत मुश्रीफ-पाटील यांनी उभय काँग्रेस एकत्रित निवडणूक लढणार हे गृहीत धरून तालुका पातळीवर जोडणी करण्याच्या प्रयत्नाला लागले आहे. त्यांना तालुकास्तरावरून किती प्रतिसाद मिळतो यावर या मरगळलेल्या पक्षांचे अस्तित्व अवलंबून असणार आहे .