कोल्हापूर : विवाहाचे औचित्य साधून दोघा जोडप्यांनी मंगळवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा यांच्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली. पावसाळी वातावरण असतानाही पाऊण तासांमध्ये हा विधी करण्यात आला.

इचलकरंजी येथील गोसावी समाजाचे नेते डॉ. आप्पासाहेब माळी यांचा मोठा जनसंपर्क होता. गेल्या महिन्यांमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाचा विवाह गोव्यातील मुलीशी ठरला होता तर गोव्यातील एका मुलाचा विवाह इचलकरंजीतील मुलीशी ठरला होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कोरोची (ता. हातकनंगले) येथे हा विवाह पार पडला.

हेही वाचा >>>“पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

दरम्यान शशिकांत – प्रियांका आणि नवनाथ – संजना या वधूवरांचे हेलिकॉप्टर मधून मंगल कार्यालयात लग्न स्थळी आगमन करण्याचा बेत आखला होता. सूर्या एव्हिएशनचे अमर सूर्यवंशी यांनी तसे करण्याऐवजी महालक्ष्मी, जोतीबा देवावर पुष्पवृष्टी करावी असे सुचवले. ते मान्य करण्यात आले. याकरिता प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी तीन वाजता दोन्ही वधू वर हे अमर सूर्यवंशी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दुपारी ३ वाजता प्रवेशले. प्रथम महालक्ष्मी व नंतर जोतीबा देवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.