भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांची पाकिस्तानने घोषित केलेली फाशीची शिक्षा रद्द व्हावी व सुटका व्हावी याकरिता शासनाने तातडीने पावले टाकावीत, यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्ह्यात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. १२ एप्रिल पासून ही मोहीम काँग्रेसच्यावतीने राबवली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी यांनी दिली.
निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा फर्मावली आहे. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे . त्यांच्या अटकेविषयीही शंकास्पद माहिती समोर आलेली होती. दोनच महिन्यांपूर्वी पाक पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात कुठलाही ठोस पुरावा पाकिस्तानकडे नसल्याचे वक्तव्य केलेले होते. तरीही अकस्मात त्याला फाशीची शिक्षा ठोठावली जाणे हा पाकिस्तानचा खोटारडेपणा आहे. पाकिस्तानी लष्करी कायद्यात देहदंडाची शिक्षेची तरतूद नसतानाही सगळे कायदें पायदळी तुडवून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी केंद्र शासनाने आक्रमक धोरण स्वीकारावे व आंतरराष्ट्रीय दबाव आणून महाराष्ट्राचे सुपुत्र जाधव यांची सुटका करावी , अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे . यासाठी राज्यभर सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. यानुसार जिल्हा काँग्रेस समितीमध्ये आमदार सतेज पाटील, जिल्हा अध्यक्ष पी.एन.पाटील यांच्यासमवेत बठक होणार आहे . त्यानंतर लगेचच जिल्ह्यात अशाप्रकारची सह्यांची मोहीम राबवली जाणार असल्याचे मुल्लाणी यांनी नमूद केले.