|| दयानंद लिपारे
नव्या साधनांची निर्मिती
जागतिक तापमानवाढीचे धोके सांगणारे सल्ले चोहोबाजूनी ऐकायला मिळतात, पण कृतिशील उपक्रमांची योजना फारशी होताना दिसत नाही. कोल्हापूरच्या ‘निसर्गमित्र’ या पर्यावरणाच्या हितासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेने सौर ऊर्जेचा वापर करणारी साधने बनवली आहेत. त्यांच्या स्वनिर्मित सौर ऊ र्जा वाळवणी यंत्र, सौर चूल आणि सौर कंदील या साधनांना मोठी मागणी आहे. आर्थिक कमाईचे उत्तम साधन असलेले हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ‘निसर्गमित्र’च्या कार्यकर्त्यांना राज्यातून, परराज्यातून निमंत्रित केले जाऊ लागले असून तेथेही या साधनांचा बोलबाला आणि वापरही सुरु झाला आहे.
जगभरच्या यांत्रिकीकरणामध्ये ऊर्जा हा घटक महत्त्वाचा ठरला. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी प्रदूषण विरहित अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे बनले आहे.
अपारंपरिक ऊर्जेचा होणारा वापर हा भावी काळासाठी बचतीचा महामंत्र होऊ बसला आहे. त्यातही सौरऊर्जा ही घरच्या उंबरठय़ापर्यंत येऊन ठेपली आहे. निसर्गमित्र या संस्थेने सौर ऊर्जेचा वापर करणारी स्वनिर्मित साधने बनवली असून त्याला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे.
नाशवंत शेतमालासाठी उपयुक्त
‘निसर्गमित्रने’ वाळवणी यंत्र’ बनवले आहे. त्यासाठी साहित्यही घरच्या घरी करता येते. अॅल्युमिनियमच्या पत्र्याला पारदर्शक काच बसवून हे यंत्र तयार केले आहे. उष्णता शोषून घेण्यासाठी अल्युमिनियमची चौकट आहे. शेतमाल वाळवण्यासाठी स्टेनलेस स्टीलची जाळी वापरली जाते. गरजेनुसार यंत्राची दिशा सहजपणे बदलण्यासाठी चाके लावली आहेत. ४० चौरस फुटात हे मजबूत वाळवणी यंत्र कार्यरत होते. यंत्रातील तापमान मोजण्यासाठी तापमापकाची सोय आहे. सुमारे ५ हजार रुपये खर्च असणारे हे यंत्र टिकाऊ आहे. निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले आणि पराग केमकर यांनी ती तयार करताना घरचा वापर आणि व्यावसायिकता अशी दुहेरी जोड दिली आहे. अनेकदा, बराचसा शेतमाल टाकून देण्याची वेळ येते. फळे, भाजीपाला आदी नाशवंत माल टाकून देण्यापेक्षा तो वाळवणी यंत्राद्वारे सुकवून पुन्हा वापरात आणता येतो. या यंत्राची पाहणी करून ती खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासाठी औद्योगिक पातळीवर याचे उत्पादन करण्यासाठी संस्थेने उद्योजकांशी संपर्क साधला आहे.
दिलासा देणारी सौर चूल, कंदील
निसर्गमित्र संस्थेची आणखी उपयुक्त निर्मिती म्हणजे सौर चूल आणि सौर कंदील. सौरऊर्जेचा वापर करून नेहमीच्या जेवणातील काही पदार्थ शिजवता येतात. तर अवघ्या ४०० रुपयात तयार होणारा हा कंदील अडचणीच्यावेळी मदतीला येणारा आहे. हंगामी कामासाठी येणारे ऊस तोडणी कामगार, निर्जनस्थळी प्रवास करणारे पर्यटक यांच्यासाठी तो मोलाची मदत करणारा आहे. ‘वाळवणी यंत्र, सौरचूल असो की सौर कंदील याची उपयुक्तता पटू लागल्याने गोवा, कोकण, विदर्भ आदी ठिकाणाहून निमंत्रण येत आहेत. कोल्हापूर प्रमाणेच आम्ही तेथेही कार्यशाळा घेऊन लोकांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे. वाळवणीचे काम उत्तम प्रकारे होत असल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे’, असे अनिल चौगुले यांनी सांगितले.