कोल्हापूर : शासन आपल्या दारी या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० वर एसटी बसेस राखून ठेवल्या असल्याने जिल्ह्यातील प्रवासी वर्गांची दैना उडाली आहे. ‘शासन आपल्या दारी प्रवासी वाऱ्यावरी ‘ अशी अवस्था झाली आहे. यामुळे एसटी प्रवाशांनी अनेक बस स्थानकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या ‘शासन आपल्या दारी’साठी सांगलीच्या १०० बस नागरिकांच्या दारात

शासन आपल्या दारी अभियानासाठी मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तसेच इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश बसेस गेल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले. शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना धारेवर धरले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला वादाची झालर

अनेक प्रवाशंनी बुकींग केले असून बहुतांश प्रवाशी नियोजित कामासाठी जाणार आहेत. अशा परिस्थितीत अचानक सर्व एस.टी. रद्द केल्याने प्रवाशांच्या गैरसोयीस जबाबदार कोण असा सावल उपस्थित केला. यावेळी अधिकार्‍यांनी नियोजित लांब पल्याच्या एस.टी. सकाळी पाठवल्या असून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी प्रवाशांची गैरसोय झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी शहराध्यक्ष संजय कांबळे, शशिकांत देसाई, बाबासो कोतवाल, प्रमोद खुडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अधिकार्‍यांना धारेवर धरल्याने दिवसभर याची बसस्थानकात चर्चा सुरू होती. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले.