सुरेश हाळवणकर यांची माहिती
इचलकरंजी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या हस्तांतरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला असून, त्यासाठी ११ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची शासनाच्या आरोग्य विभागाकडे समावेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आयजीएम शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या गेल्या ६ वर्षांच्या प्रयत्नानंतर मंत्रिमंडळाच्या २१ जून रोजी झालेल्या बठकीत हे हॉस्पिटल आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इचलकरंजी नगरपरिषदेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे या रुग्णालयाच्या मालकी हक्कासह, संबंधित भूखंड व इमारती, यंत्रसामग्रीसह (आíथक दायित्व वा बोजाविरहित) सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नगरपरिषदेच्या अन्य प्रयोजनार्थ उपयोगात आणता येत असल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट होण्याचा विकल्प देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हस्तांतरणानंतर रुग्णालयावरील संपूर्ण खर्च सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यास व त्यासाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद (वार्षकि रु. ११ कोटी आवर्ती) करण्यास मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे हे हॉस्पिटल लवकरच शासनाकडे हस्तांतरित होऊन उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपचार सेवा पुरवणे, अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे रुग्णांवर उपचार करणे, तज्ज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्गाद्वारे रुग्णसेवेचा स्तर उंचावणे ही उद्दिष्टे साध्य होणार आहेत, अशी माहिती हाळवणकर यांनी दिली.