कोल्हापूर : कापशी (ता. कागल) येथे वर्गात मुलींशी गैरवर्तन करीत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केल्यानंतर मंगळवारी जमावाने संबंधित शिक्षकास शाळेच्या आवारात बेदम मारहाण केली. मुरगुड पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला ताब्यात घेतले. तर, संस्थेने त्याला बडतर्फ केल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले.
काही वर्षापूर्वी मुरगुड येथील शाळेत मुलीशी गैरवर्तन करीत असल्यामुळे पालकांनी याच शिक्षकाला चोप दिला होता. त्यावेळी त्यांची बदली कापशी येथे करण्यात आली होती. कापशी येथे सुद्धा हा सहायक शिक्षक शाळेत मुलींशी गैरवर्तन, अश्लील शब्द वापरत असे. त्याच्याकडून होणार त्रास सहन न झाल्यामुळे मुलींनी पालकांना याबाबत सांगितले.
आज पालक शाळेसमोर आले. त्यांचा राग अनावर झाला. शाळेच्या आवारातच त्यांनी संशयित शिक्षकाला बेदम चोप दिला. त्याला शाळेच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथेही त्याला मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयिताला पोलीस ठाण्यात नेले. मात्र यावेळी संशयितावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी करीत पालकांनी पोलीस गाडीला घेराव घातला. कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी गाडी सोडली. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.
बाजारपेठ बंद
ग्रामस्थ व पालकांनी घटनेचा निषेध करीत संशयित आरोपी विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेचा निषेध म्हणून फेरी काढून कापशी बाजारपेठ बंद करण्यात आली.