कोल्हापूर: पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिलचे (पीडीएक्सएल) संस्थापक अध्यक्ष, राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग अभ्यासक धनपाल अण्णासो टारे (वय ८७) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने इचलकरंजीतील जाणकार नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयावेळी त्यांचा सल्ला मोलाचा मानला जात होता. देशातील वस्त्रोद्योग उत्पादने अधिक निर्यात व्हावीत यासाठी त्यांनी मोठी धडपड केली. त्यांच्याच प्रयत्नाने छोटा यंत्रमागधारकही कापड निर्यातीची बाजारपेठ काबीज करू शकला. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात. त्यांच्या प्रयत्नाने इचलकरंजीत राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद आयोजित केली होती. त्याला तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंग वाघेला उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यावर इचलकरंजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगभरचा अभ्यास
देशातील वस्त्रोद्योगातील एक जाणकार नेते म्हणून धनपाल टारे यांची ओळख होती. या क्षेत्रातील विविध संस्थांवर त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. देशभर संघटित असणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी एकत्र जोडण्यासाठी ऑल इंडिया पॉवरलूम फेडरेशनची स्थापना करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंटचे ते अध्यक्षही होते. याशिवाय महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष, इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांची जुनी संस्था असलेल्या इचलकरंजी पाॅवरलूम असोसिएशनचेही ते अध्यक्ष होते. त्यांना जगभरातील कापड बाजारपेठेत काय घडामोडी घडत आहेत याची अचूक समज असे.
कुशल समन्वयक
इचलकरंजी शहरातील यंत्रमाग आणि कामगारांच्या संघर्षावेळी धनपाल टारे यांचे निवासस्थान म्हणजे कामगार आणि यंत्रमागधारकांच्या नेत्यांसाठी एक विश्वासाचे ठिकाण होते. धनपाल टारे यांच्या नेतृत्वाखालीच अनेक आंदोलनावेळी मार्ग निघत असे. कामगार नेते माजी आमदार के. एल. मलाबादे यांचाही त्यांच्यावर मोठा विश्वास होता. कामगारांच्या आंदोलनावेळी धनपाल टारे यांनी टाकलेला शब्द महत्त्वाचा ठरत असे. एकीकडे यंत्रमाग धारकांचे नेते प्रकाश आवाडे तर दुसरीकडे कामगारांचे नेते कॉम्रेड के. एल. मलाबादे अशा भिन्न विचारांच्या नेत्यांना एकत्रित आणून यंत्रमाग जॉब रेट, कामगार वेतन वाढ अशा किचकट प्रश्न- आंदोलनात धनपाल टारे हे उत्तम समन्वयाचा मार्ग काढीत असत.