युवराज केळुस्कर यांचे मत

एकांकिका माध्यमातून तरुणाईच्या जाणिवा समृद्ध होण्यास मदत होते. ‘लोकांकिका’ स्पर्धेने या उपR माला नवा आयाम मिळवून दिला आहे. ताज्या दमाची संहिता शोधून त्यावर कलाकृती सादर करण्याचे आव्हान पेलणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर असते. त्यामुळे तरुण कलाकारांना नवा समृद्ध करणारा अनुभव लोकसत्ताच्या ‘लोकांकिका’ मधून मिळतो, अशा भावना युवराज केळुस्कर याने व्यक्त केल्या.

सध्या लोकसत्ता च्या ‘लोकांकिका’चे वारे महाविद्यालय जगतात वाहत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवून तालमींना सुरुवात केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत नाटय़ विभागाने ‘लोकांकिका’ मध्ये सहभाग नोंदवला आहे. ज्ञानेश मुळे लिखित ‘तोच चंद्रमा नभात’ ही एकांकिका ते सादर करणार आहेत.

या एकांकिकेमध्ये युवराजकडे प्रकाश योजनेची जबाबदारी असली तरी यापूर्वी ‘पुरुषोत्तम करंडक’ सारख्या स्पर्धेत त्याने अभिनय, लेखन, दिग्दर्शन म्हणून पारितोषिके पटकावली आहेत. याच चमूतील युवराजने ‘लोकांकिका’ विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

युवराज याने सांगितले की, महाराष्ट्राला आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा काही नवीन नाहीत. पण अल्पकाळात ‘लोकांकिका’ ने शैक्षणिक-सांस्कृतिक वर्तुळात आपला ठसा उमटवून या क्षेत्रातील आपले महत्त्व अधिरेखीत केले आहे. या स्पर्धेची गुणवत्ता, विद्यार्थिप्रियता आणि प्रतिष्ठा खरेच उच्च दर्जा, अभिरुची असणारी आहे. या स्पर्धेशी नात्याने संबंध आलेल्यांना निश्चितपणे आनंद, अभिमान वाटत राहावा.  मराठी रंगभूमीच्या कौतुकाचा विषय ठरलेली ही स्पर्धा महाविद्यालयीन तरुणांना खुणावत असते. या ओढीनेच आमचा संघ स्पर्धेत उतरला आहे. त्याची तयारी जोरदारपणे सुरू आहे. काही नवे-काही अनुभवी कलाकार आहेत. सराव करत दोष निराकरण, नवा विचार पेरत पुढे जात आहोत. भारताची चांद्रयान मोहीम चांगलीच गाजली. सामन्याच्या जीवनातही चंद्रासम मधुर स्वप्ने असतात. मात्र ती वास्तवातल्या कठोर स्थितीत पूर्ण होतात का? यावर हलके फुलके सादरीकरण करीत काही संदेश आम्ही देऊ पाहतो. बाकी, आयोजानातली शिस्त उत्कृष्ट असते. स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच समाधान वाटते. मुख्य म्हणजे आदर वाटावेत अशा व्यक्ती या परीक्षक असतात. माझ्यापुरते बोलायचे तर ‘लोकांकिका’ चा अनुभव घेण्यासाठी मी आतुर झालो आहे.

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.