जातीचा दाखला अवैध ठरला असल्याने महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती, काँग्रेस नगरसेविका वृषाली कदम यांना पदाला मुकावे लागल्याने नवा सभापती निवडण्यासाठी शुक्रवारी २ अर्ज दाखल झाले. तर काँग्रेस गट नेते शारंगधर देशमुख यांनी स्थानिक न्यायालात धाव घेतली.
प्रशासनाने न्यायालयासमोर म्हणणे मांडणार असल्याचे सांगत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवली .
जातपडताळणी प्रमाणपत्रं वेळेत सादर केली नसल्याने महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांचा जातीचा दाखला बुधवारी अवैध ठरला.
या पदासाठी १७ मे रोजी निवड प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेविरोधात काँग्रेस गट नेते शारंगधर देशमुख यांनी स्थानिक न्यायालात आज धाव घेतली होती.
न्यायालयाने प्रशासनास १६ मे रोजी म्हणणे मांडण्याचा आदेश दिला. त्याआधारे देशमुख यांनी न्यायालयाने निवड प्रक्रिया स्थगित झाल्याचे प्रशासनास सांगितले, पण त्यास विरोधकांनी आक्षेप घेत न्यायालयाने कोठेही स्थगिती दिली नाही, केवळ म्हणणे मांडण्यास सांगितले असल्याचा दावा केला.
त्यांनी प्रशासनास गीता गुरव यांचा अर्ज भरून घेण्यास भाग पाडले. तर, काँग्रेस पक्षाच्या वतीने वनिता देठे यांचा अर्ज भरण्यात आला. न्यायालाच्यासमोर १६ मे रोजी म्हणणे मांडणार आहोत, तेव्हा न्यायालय देईल त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.