लाच स्वीकारण्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने शासकीय वस्तीगृहातील गृहपालास एक वर्ष साधी कैद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावण्यात आली. जोतीबा रामचंद्र नलवडे (वय ६१) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी राजेश विश्वासराव सनदे (रा. सदर बाजार ) हे जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांना भोजनपुरवठा करणारे मक्तेदार आहेत. त्यांनी दसरा चौकातील मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाला नाश्ता व भोजन पुरवले होते. त्याचे बिल तयार करून मंजुरीसाठी करिता नलवडे याने धनादेश देण्याकरिता १० हजार व बिल मंजुरीसाठी पाठवण्याकरिता १० हजार अशी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर तडजोडी अंती १० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.
१५ एप्रिल २०१३ रोजी येथील प्रभात चित्रमंदिर समोरील रस्त्यावर पंच साक्षीदारांच्या समक्ष १० हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना नलवडे यास रंगेहात पकडले लक्ष्मीपुरी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी सत्र न्या. एच. ए. मुल्ला यांच्यासमोर झाली. जिल्हा सरकारी वकील विवेक ह. शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोकवण्यात आली आहे.