पुणे येथील उच्चशिक्षित तरुणाने येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दिनेश चंद्रकांत आरणे (वय ३९ रा. मंगळवार पेठ, ससून, पुणे) असे मृताचे नांव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात झाली.
दिनेश आरणे शनिवारी कोल्हापुरात आले होते. आनंद मल्हार लॉजच्या १११ नंबर रुममध्ये ते उतरले होते. रविवारी सकाळी हॉटेलचा रुम बॉय दिनेश यांना उठविण्यासाठी गेला होता. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने रुमचा दरवाजा तोडण्यात आला. आत पाहिले असता दिनेश यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधून घटनेचा पंचनाम केला. मृतदेहाच्या खिशातील ओळखपत्रावरुन ओळख पटली. दिनेशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. दिनेश आरणे याने आत्महत्येपूर्वी पायावर पेनाने ‘पोस्ट मार्टम करणारे साहेब, जरा प्रेमाने फाडा, आधीच खूप फाटले आहे,’ असा मजकूर लिहिला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या मजकुरावरुन शोध पोलीस घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2016 रोजी प्रकाशित
पुण्यातील तरुणाची कोल्हापुरात आत्महत्या
दिनेश आरणे शनिवारी कोल्हापुरात आले होते. आनंद मल्हार लॉजच्या १११ नंबर रुममध्ये ते उतरले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 20-06-2016 at 00:02 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well educated young man belong to pune commit suicide in kolhapur