कोल्हापूर : माजी आमदार के. पी. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश नसून स्वागत आहे. त्यांच्या मनात सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे. आगामी काळात के. पी. पाटील यांची पाठराखण करतानाच पक्षात त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मुदाळ (ता. भुदरगड) येथे माजी आमदार, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ठाकरेसेनेला जय महाराष्ट्र करून स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, के. पी . पाटील यांना काही पर्यायी मार्ग स्वीकारावे लागले पण त्यांच्या मनातील राष्ट्रवादीचे स्थान आढळ राहिले. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितपणे फायदा होईल.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी के. पी. पाटील आणि आपली मैत्री अढळ राहिली आहे. आता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाला आणखी उभारी घेता येणार आहे. त्यांना ताकद देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिद्री कारखान्याच्या उभारणीत अजितदादांनी मोलाचे योगदान दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी पाठराखण केल्याने राजकीय वाटचाल करता आली, अशी कृतज्ञता व्यक्त करत के. पी. पाटील म्हणाले, साखर कारखाना, सूतगिरणी, शिक्षण संस्था आदी संस्थात्मक काम अधिक प्रभावीपणे करतानाच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विजयी होण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले जातील. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, रणजित पाटील, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक, नागरिक उपस्थित होते.