कोल्हापूर :- नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा देखील जाहीर विरोध असून शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करूया, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.

अजिंक्यतारा जनसंपर्क कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील बोलत होते. नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून जाणार आहे. या मार्गासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या शक्तीपीठ मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी विविध गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालय येथे भेट घेतली. यावेळी, बोलतांना आमदार सतेज पाटील यांनी, कोणत्याही कार्याची कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही राज्यभर पोहचत असते. त्यामुळे आणि नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची सुरवात कोल्हापुरातून करुया, असे आवाहन त्यांनी केले. या महामार्गाची माहिती अजूनही लोकांना नाही. खरोखरचं याची लोकांना गरज आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थीत करत, जमिनी घेवून रस्ता करणे हे संयुक्त ठरणार आहे काय? याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पात जुन्या योजनांना कल्हई करण्यावर भर; करवाढ टाळली

कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ते ९४ टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील आहेत. या महामार्गाच्या विरोधासाठी अकरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय गरज नसलेला हा महामार्ग असून कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही नको ती कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसचा याला जाहीर विरोध राहील असेही त्यांनी जाहीर केले. शक्तीपीठ मार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी संघटित ताकद ठेवा, असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरिषसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांना न्याय आणि ताकद देण्याची शक्ती केवळ सतेज पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे या लढ्याचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. शक्ति मार्गमुळे जवळपास ४०० एकर जमीन या महामार्गाखाली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमीहिन होणार असल्याचही घाटगे यांनी सांगितले.

हेही वाचा – खासदार धैर्यशील माने यांच्या फलकावरील क्युआर कोडवर कुटचलनाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे चेअरमन एम पी. पाटील यांनी, शक्तीपीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आता विरोधाशिवाय पर्याय नाही, जनरेट्याबरोबरच न्यायालय लढा देखील लढूया असे आवाहन त्यांनी केल. बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी देवाधर्माच्या नावाखाली प्रत्येकाची गळचेपी करण्याचे काम सरकार करत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही घेण देणे नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्ग परतवून लावायचा असेल तर आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुधीर पाटोळे, मल्हारी पाटील, दादासो पाटील यांच्यासह तेरा गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.