कोल्हापूर : पत्नीचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघे कुटुंब शोकाकुल होते. उत्तर कार्याची तयारी सुरू होती. पण जिचे अंत्यसंस्कार केले ती पत्नीच साक्षात दारात उभे राहिली. या घटनेमुळे पतीसह कुटुंबीय कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे घडलेल्या या घटनेची वेगळीच चर्चा होत आहे.

त्याचे असे झाले. संजना महेश ठाणेकर (वय ३९,राहणार उदगाव तालुका शिरोळ ) या १९ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाली झाल्या होत्या. त्यावर पती महेश ठाणेकर यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती.  तर २९ ऑगस्ट रोजी निलजी बामणे (तालुका मिरज) येथे कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह फुगलेला होता. चेहरा ओळखण्यासारखा नव्हता. अंगावरील कपडे गालावरील तीळ यावरून महेश ठाणेकर यांनी हा मृतदेह पत्नी संजनाचा असल्याची पुष्टी दिली.

त्यानंतर शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जन विधीही पार पडला.यानंतर कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत होते. परंतु संजना या गावात एका बचत गटाचे पैसे देण्याच्या निमित्ताने आल्या. त्या जिवंत असल्याचे पाहून ग्रामस्थांचे हातपाय गळाले . थरकाप उडालेल्या ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संजना यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. तेव्हा घरगुती कारणातून आपण तासगाव, बारामती या गावांना गेल्याचे सांगितले.

संजना जिवंत परत आल्याचे पाहून कुटुंबियांना आनंद झाला. तथापि , मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेली ती महिला कोण याची मात्र चर्चा सुरू आहे. हा मृतदेह आता कोणाचा असावा, तो कृष्णा नदीत कसा आला, त्याच्या मागे काही कारस्थान आहे का याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे दरम्यान या घटनेबाबत बोलताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितले की, संजना महेश ठाणेकर या हरवल्या असल्याची तक्रार पती महेश ठाणेकर यांनी पोलिसांमध्ये दिली होती. तथापि याचवेळी निलजी बामणे येथे एक मृतदेह सापडला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मृतदेहाची खात्री करण्यासाठी महेश ठाणेकर यांना बोलावले गेले. त्यांनी कपडे, इतर खुणा पाहून हा मृतदेह पत्नीचा असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार त्यांच्याकडे मृतदेह देण्यात आला. कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु संजना ठाणेकर या गावात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले. त्या तासगाव ,बारामती येथे गेल्याची माहिती मिळाली. अंत्यसंस्कार करण्यात आलेली महिला ही वेगळीच असल्याचे आता दिसत आहे. मृतदेह असलेली महिला कोण आहे,याचा शोध आता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून घेतला जाणार आहे.