कोल्हापूर : इचलकरंजी येथे गाडीचे हप्ते भरण्यावरुन झालेल्या वादातून रोहित बाळू तडाखे (वय २५ रा. साईट नं. १०२) याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन गळा चिरुन निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली. साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली. या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा बाळू तडाखे (वय ४०) यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर (तिघे रा. साईट नं. १०२) हा फरारी आहे.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, मुळचा जाधव मळा परिसरात राहणारा रोहित तडाखे हा काही महिन्यांपासून साईट नं. १०२ मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करुन राहत होता. याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा सहा महिन्यांपूर्वी वाद झाला होता. राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्जप्रकरण करुन दुचाकी घेतली होती. परंतु त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते.

आणखी वाचा-नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने दिल्लीत हवेतच- सुरेश हाळवणकर

सततच्या या तगाद्याला रोहित त्रासला होता. या संदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली. त्यावरुन रोहित व राहुल यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर जावीर या तिघांनी रोहित याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला.

त्या वादातच राहुल, संदेश व शंकर या तिघांनी धारदार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रोहित याच्या दंडावर व गळ्यावर वर्मी घाव बसल्याने रोहित याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी रोहित याचा गळा इतका चिरला होता की त्याच्या कंठाचे हाड दिसून येत होते.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे, गावभाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक प्रविण खानापुरे आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. त्यामध्ये तिघांनी हल्ला करुन रोहित याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. रोहित याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट, संदेश पाथरवट व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-माजी सैनिकांसमवेत शाहू महाराजांनी साजरी केली रंगपंचमी

यातील संशयित राहुल पाथरवट हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गावभाग, शिवाजीनगर, शहापूर आणि हुपरी पोलिस ठाण्याच विविध स्वरुपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे करत आहेत. राहुल आणि संदेश पाथरवट या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली.