कोल्हापूर : देशाच्या सीमेवर शत्रूबरोबर अतिशय हिमतीने लढत देशाची काळजी घेतलेल्या, डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करुन निवृत्त झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांसमवेत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन महाराजांनी ‘तिरंगा उंचावून राष्ट्राचा सन्मान राखूया’, असे आवाहन केले.

आज रंगपंचमीच्या दिवशी न्यू पॅलेसवर माजी सैनिकांच्या समवेत शाहू महाराजांनी रंगपंचमी साजरी केली. उपस्थित माजी सैनिकांनी कडक सॅल्यूट ठोकून तर काही सैनिकांनी ‘रामराम साब’ अशा शब्दात महाराजांचे स्वागत केले. त्यांनतर महाराजांनी प्रत्येक सैनिकाला केशरी, पांढरा आणि हिरवा असे तिरंगी रंग लावले. सैनिकांनीही महाराजांना तिरंगी रंग लावून शुभेच्छा दिल्या. महाराजांच्या समवेत रंगपंचमी साजरी करण्याचे आम्हाला भाग्य लाभले अशा भावना सैनिकांनी व्यक्त केल्या.

आणखी वाचा-कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे म्हणाले, ‘महाराजांचे आणि सैनिकांचे नाते कायम चांगले आहे. मराठा रेजिमेंटचे दैवत राजर्षी शाहू महाराज असून त्यांच्या प्रेरणेने आम्ही सैन्यात भरती झालो आहोत. त्यांच्या समवेत आज आम्हाला रंगपंचमीचा आनंद लुटायला मिळाले याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे’. सैनिक परिवाराला १७ एकर जागा मिळाली आहे, त्यासाठी शाहू छत्रपतींनी सहकार्य केले आहे. त्यामुळे आम्ही ताराबाई पार्क येथे आमच्या सैनिकांचे कार्यालय, महासैनिक दरबार उभारु शकलो, अशी भावना हांडे यांनी व्यक्त करत त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देत ‘जिथे कमी तिथे आम्ही” असणार आहोत असे सांगितले.

मेजर सुभेदार आणि ऑनररी कॅप्टन तानाजी खाडे म्हणाले, ‘मराठा रेजिमेंट आणि राजाराम रायफल ही राजर्षी शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराजांची प्रेरणा होती. या बटालियनमध्ये आम्हाला सियाचीनसह देशाच्या सर्व सीमांवर कर्तव्य बजावायची संधी मिळाली. शाहू छत्रपतींनी अनेकवेळा सैन्यदलाला भेट देऊन आमचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. कौतुकाची थाप ठोकली आहे. यापुढे शाहू छत्रपतींच्या प्रत्येक कार्यात आम्ही त्यांची साथ देऊ.

आणखी वाचा-कोल्हापुरात शिवसेनेने प्रचार थांबवला, संदेशाने खळबळ; जिल्हाप्रमुखांकडून इंकार

संघटनेचे सचिव एन.एन. पाटील सांगवडेकर म्हणाले, ‘४८ वर्षापूर्वी शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने माजी सैनिकांच्या संघटनेची स्थापना झाली. त्यांच्या प्रेरणेने महासैनिक दरबार आणि कार्यालय उभारु शकलो. जिल्ह्यात २० ते २२ हजार माजी सैनिक असून त्यांचे सर्व कुटुंबिय महाराजांच्या पुढील कार्यासोबत सदैव तत्पर असतील’.

शाहू महाराज यांनी माजी सैनिकांसमवेत रंगपंचमी साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल संघटनेचे आभार मानले. गेली अनेकवर्षे लष्कारातील अधिकारी आणि सैनिकांसमवेत जोडलो गेलो आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा लष्कराच्या ठाण्याला आणि कार्यालयाला भेट देत असतो. सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापूर्वी काम केले असून यापुढेही केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे सचिव बी.जी. पाटील, शशिकांत साळुंखे, रत्नाकर निराळे यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.