१९७१ मध्ये वेस्ट इंडिजच्या भूमीवर मिळवलेला विजय हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्या काळात वेस्ट इंडिजची बलाढय़ क्रिकेट संघ म्हणून गणना केली जात होती. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर १-० असे नामोहरम केले. नवनिर्वाचित कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे संस्मरणीय यश भारताने मिळवले. १९ एप्रिल, १९७१ या दिवशी कॅरेबियन भूमीवरील भारताच्या ऐतिहासिक पराक्रमाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

१३ जानेवारी १९७१ या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. निवड समितीने मन्सूर अली खान पतौडी आणि चंदू बोर्डे यांना वगळून वाडेकर यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हा क्रिकेटजगताच्या भुवया उंचावल्या. भागवत चंद्रशेखर, फारुख इंजिनीयर आणि रुसी सुरती यांनाही निवड समितीने डच्चू देत श्रीनिवास वेंकटराघवन यांच्याकडे उपकर्णधारपद सोपवले. पहिल्या कसोटी सामन्याआधी भारताला सहा सराव सामने खेळायची संधी मिळाली.

सुनील गावस्कर नामक ध्रुवताऱ्याचा क्रिकेटच्या क्षितिजावरील उदयही याच मालिकेत झाला. आपल्या कारकीर्दीतील पदार्पणीय कसोटी मालिकेत सुनीलने विंडीजच्या वेगवान माऱ्यासमोर वर्चस्व गाजवले. तीन शतके आणि एक द्विशतकासह त्याने सर्वाधिक ७७४ धावा काढल्या. सुनीलचे भारतीय कसोटी संघातील स्थान याच मालिकेने अधोरेखित केले. त्यानंतर सुमारे १७ वर्षे त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. दिलीप सरदेसाई यांच्या फलंदाजीचेही या मालिकेत महत्त्वाचे योगदान होते. पोर्ट ऑफ स्पेनची दुसरी कसोटी भारताच्या मालिका विजयात महत्त्वाची ठरली. हा विंडीजमध्ये भारताने मिळवलेला पहिला कसोटी विजय, पण याच विजयामुळे भारताला मालिकेवर प्रभुत्व मिळवता आले.

पहिली कसोटी

१८ ते २३ फेब्रुवारी १९७१ : सबिना पार्क (किंग्स्टन)

पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यानंतर पहिल्या डावात भारताची ५ बाद ७५ अशी अवस्था झाली. परंतु सरदेसाई यांनी एकनाथ सोलकर (६१) यांच्या साथीने सहाव्या गडय़ासाठी १३७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. सरदेसाई (२१२) यांच्या द्विशतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३८७ धावा उभारल्या. त्यानंतर इरापल्ली प्रसन्नाच्या प्रभावी फिरकी माऱ्यापुढे विंडीजचा संघ २१७ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने फॉलोऑन लादून विंडीजला पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विंडीजने दुसऱ्या डावात मात्र ५ बाद ३८५ धावा करीत सामना अनिर्णीत राखला. रोहन कन्हायने १५८ धावा केल्या.

दुसरी कसोटी

६ ते १० मार्च १९७१ : क्वीन्स पार्क ओव्हल (पोर्ट ऑफ स्पेन)

गावस्करने पोर्ट ऑफ स्पेनला कसोटी पदार्पण केले, ते भारतासाठी यशस्वी ठरले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या विंडीजचा इरापल्ली प्रसन्नाच्या (४/५४) फिरकीपुढे निभाव लागला नाही आणि त्यांचा पहिला डाव २१४ धावांत आटोपला. यात चार्ली डेव्हिसने ७१ धावा केल्या. मग सरदेसाईच्या (११२) शतकामुळे भारताने ३५२ धावांचे जोरदार प्रत्युत्तर दिले. विंडीजच्या जॅक नोरिगाने ९५ धावांत ९ बळी घेत लक्ष वेधले. मग वेंकटराघवनच्या फिरकीपुढे विंडीजची दुसऱ्या डावात २६१ धावांत तारांबळ उडाली. रॉय फ्रेड्रिक्स (८०) वगळता बाकीच्या विंडीजच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. त्यामुळे विजयाचे लक्ष्य भारताने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केले आणि कॅरेबियन भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवण्याचा पराक्रम दाखवला. गावस्कर यांनी ६७ धावांची खेळी साकारत ठसा उमटवला.

तिसरी कसोटी

१९ ते २४ मार्च १९७१ : बोर्डा (जॉर्जटाऊन)

भारताकडून पत्करलेल्या पराभवामुळे डिवचलेल्या विंडीजने संघात बदल करताना कीथ बॉयसे आणि डेसमंड लुइस यांना स्थान दिले. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना लुइसच्या ८१ धावांच्या बळावर ३६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत ३७६ धावांसह वरचढ ठरला. गावस्करचे (११६) पहिले कसोटी शतक हे या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३ बाद ३०७ धावसंख्येवर डाव घोषित केला. चार्ली डेव्हिसने यात १२५ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात बिनबाद १२३ धावा करीत हा सामना अनिर्णीत राखला. गावस्करने दुसऱ्या डावातही ६४ धावा काढल्या.

चौथी कसोटी

१ ते ६ एप्रिल १९७१ : केन्सिंग्टन ओव्हल (ब्रिजटाऊन)

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विंडीजने गॅरी सोबर्सच्या (१७८) शतकी खेळीच्या बळावर ५ बाद ५०१ धावसंख्येवर डाव घोषित केला. भारताला मात्र पहिल्या डावात ३४७ धावा करता आल्या. यात सरदेसाईने १५० धावा करीत योगदान दिले. सामना निर्णायक करीत मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने विंडीजने दुसरा डाव ६ बाद १८० धावसंख्येवर घोषित केला आणि विजयासाठी ३३५ धावांचे लक्ष्य भारताला दिले. अबिद अलीने ७० धावांत ३ बळी घेतले. भारताने ५ बाद २२१ धावा करीत कसोटी अनिर्णीत राखली. या वेळी पुन्हा गावस्करने (११७) शतक साकारले.

पाचवी कसोटी

१३ ते १९ एप्रिल १९७१ : क्वीन्स पार्क ओव्हल (पोर्ट ऑफ स्पेन)

विंडीजला मालिकेतील पराभव टाळण्याची ही अखेरची संधी होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मग गावस्करच्या (१२४) शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३६० धावा केल्या. विंडीजने मात्र पहिल्या डावात ५२६ धावा केल्या आणि सामन्यावरील पकड घट्ट केली. गॅरी सोबर्सने १३२ धावांचे योगदान दिले. भारताकडून वेंकटराघवनने १०० धावांत ४ बळी घेतले. त्यानंतर भारताने गावस्करच्या (२२०) द्विशतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या डावात ४२७ धावा केल्या. विंडीजपुढे विजयासाठी २६२ धावांचे तुटपुंजे आव्हान भारताने ठेवले होते. पण ४० षटकांत विंडीजचा ८ बाद १६५ असा डाव गडगडला. आणखी दोन बळी भारताला मिळाले असते, तर मालिकेत २-० असा विजय मिळवता आला असता. पण क्लाइव्ह लॉइडच्या ६४ धावांमुळे विंडीजने जेमतेम कसोटी अनिर्णीत राखली. अबिद अलीने तीन आणि वेंकटराघवनने दोन बळी घेतले.

हा बदल मोठा होता..

भारताने वेस्ट इंडिजमध्ये मिळवलेला विजय ऐतिहासिक का ठरला आणि त्याने फरक काय पडला, याविषयी त्या विजयाचे एक शिलेदार अष्टपैलू क्रिकेटपटू सय्यद अबिद अली यांच्याच शब्दांत..

१९७१चा वेस्ट इंडिजमधील ऐतिहासिक कसोटी विजय आजसुद्धा अभिमानास्पद वाटतो. ते क्षण आजही मी जगतो आहे. मी सध्या अमेरिकेत असतो, परंतु बेदी, प्रसन्ना आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधतो, तेव्हा त्या ऐतिहासिक यशाच्या आठवणी आम्ही जागवतो. कारण आम्ही देशासाठी खेळायचो, ती भावनाच आम्हाला प्रेरणा द्यायची आणि त्याच विजयाने देशात क्रिकेटपटूंना प्रतिष्ठा दिली. वेस्ट इंडिजचा संघ त्या काळात क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ मानला जायचा. नव्या जोमाच्या खेळाडूंसह कर्णधार गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय आणि क्लाइव्ह लॉइड ही सराईत त्रयी भलतीच लयीत होती.

१९६७ मध्ये वेस्ट इंडिजने भारतात २-० अशी मालिका जिंकण्याची किमया साधली होती. त्या वेळी मन्सूर अली खान पतौडी भारताचे कर्णधार होते. त्यानंतर पतौडी यांनी सर्व खेळाडूंना बोलावून एक बैठक घेतली. ‘‘आपण विविध राज्यांमध्ये राहतो आणि खेळतो. पण प्रतिस्पर्धी देशाविरुद्ध जेव्हा खेळतो, तेव्हा आपल्या देशासाठी एकसंध होऊन खेळतो आहोत, याचे भान राखा,’’ हे पतौडी यांनी आम्हा खेळाडूंच्या मनावर बिंबवले. एकत्रितपणे खेळताना, सामन्यांदरम्यान एकत्र राहताना ही भावना मग अधिक दृढ होत गेली. याच पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारताला न्यूझीलंडमध्ये परदेशातील पहिल्या कसोटी विजयाची चव चाखता आली.

१९७१ मध्ये कॅरेबियन दौऱ्यावरून विजयश्री मिळवून आलो, तेव्हा देशात आमचे जल्लोषात स्वागत झाले. या मालिकेसाठी पतौडी यांच्याकडून कर्णधारपदाची सूत्रे अजित वाडेकर यांच्याकडे सोपवण्यात आली. वाडेकर यांचे नेतृत्व भारताला यशदायी ठरले. सुनील गावस्कर हा ध्रुवतारा याच मालिकेत भारताच्या क्रिकेट क्षितिजावर तळपला. त्याने वेस्ट इंडिजच्या तेजतर्रार वेगवान माऱ्याचा धीराने सामना केला आणि भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याचप्रमाणे दिलीप सरदेसाई यांचेही मोलाचे योगदान होते. त्रिनिदादच्या दुसऱ्या कसोटीत भारताने विंडीजला सात गडी राखून नमवले. या सामन्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती. त्यामुळे बिशनसिंग बेदी, ईरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि सलीम दुराणी या फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.

१९७१च्या विजयाने देशात क्रिकेटमय वातावरण रुजू लागले. हा बदल खूप मोठा होता. आम्ही देशात कुठेही गेलो, तरी आम्हाला मानसन्मान दिला जाऊ लागला. परंतु पसा नाही मिळाला, ही वस्तुस्थिती होती. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटपटूंना कोटय़वधी रुपये मानधन देते, तेव्हा प्रत्येक दिवसाचे शंभर रुपये मिळायचे. याचप्रमाणे कसोटी मालिकेसाठी दोन ते अडीच हजार रुपये मानधन मिळायचे. आताच्या क्रिकेटपटूंना मात्र अमाप पसा मिळत आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने आमच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंसाठी काही तरी करावे, हीच इच्छा आहे.

भारताकडून  सर्वाधिक धावा

सुनील गावस्कर       ७७४

दिलीप सरदेसाई       ६४२

एकनाथ सोलकर      २२४

भारताकडून  सर्वाधिक बळी

एस. वेंकटराघवन      २२

बिशनसिंग बेदी        १५

ईरापल्ली प्रसन्ना      ११

(शब्दांकन : प्रशांत केणी)