FIFA World Cup 2022 ही स्पर्धा कतारमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा फुटबॉल संघ पात्र ठरलेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाला सहभागी होता येणार नाही. मात्र भारताच्या क्रिकेट संघाला या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. FIFA World Cup 2022 स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल खाटेर यांनी भारताच्या १९८३ आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वविजेत्या क्रिकेट संघाला आमंत्रित केले आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे आमंत्रण दिले.

FIFA World Cup 2022 हा आनंदोत्सव आहे. त्यामुळे हा उत्सव साऱ्यांनी एकत्रपणे साजरा करायला हवा. मला भारतातील क्रिकेटप्रेम किती व्यापक आहे, याची कल्पना नव्हती. पण १९८३ आणि २०११ या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताने विजेतेपद मिळवले होते, त्यापैकी काही खेळाडू येथे आहेत. मी त्यांना ओळखतो. त्यामुळे मी स्वतः या दोनही संघाच्या खेळाडूंना FIFA कडून मी विशेष आमंत्रण देतो, असे खाटेर म्हणाले.

भारतीय संघाने दोन विश्वचषक जिंकले आहेत. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तर त्यानंतर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. मात्र भारतीय फुटबॉल संघाला विश्वचषक स्पर्धेत अद्याप संधी मिळालेली नाही. त्यातच नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या FIFA क्रमवारीत भारत टॉप १०० मधूनही बाहेर फेकला गेला आहे.