प्रजासत्ताक दिनी भारताला प्रथमच एकदिवसीय सामन्यात विजय मिळवता आला. याआधी प्रजासत्ताक दिनी झालेल्या तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. प्रजासत्ताक दिनाला झालेल्या पाचव्या सामन्यात भारताने विजयी पताका फडकवली आहे. भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव करत इतिहास बदलला आहे.

२६ जानेवारीला आजपर्यंत भारताने ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २६ जानेवारी १९८६ ला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. त्यात भारत ३६ धावांनी पराभूत झाला होता. २६ जानेवारी २००० रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने १५२ धावांनी विजय मिळवला होता. तर २६ जानेवारी २०१५ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना अनिर्णित राहिला.

कुलदीप यादवची भेदक गोलंदाजी आणि रोहित-धवन यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने भारतीयांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिली आहे. भारताने दिलेल्या ३२५ धावांचा पाठलाग करताना ४०.२ षटकांत न्यूझीलंडचा संघ २३४ धावांवर गारद झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात सात बळी घेतले. कुलदीप यादवने चार बळी घेत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. चहलने दोन आणि केदार जाधवने एक बळी घेत कुलदीपला चांगली साथ दिली. याशिवाय भुवनेश्वरने दोन आणि शामीने एका फलंदाजाला बाद केले.