श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दणदणीत विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असले तरी दुसऱ्या सामन्यात विजयामध्ये सातत्य राखण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. दुसरीकडे मानहानीकारक पराभव श्रीलंकेच्या जिव्हारी लागला असून हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
पहिल्या सामन्यामध्ये भारताने द्विशतकी सलामीच्या जोरावर श्रीलंकेला हादरा दिला होता. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या दोघांनीही शतके झळकावत संघाला दमदार सुरुवात करून देत विजयाचा पाया रचला होता. मधल्या फळीतील सुरेश रैना, विराट कोहली आणि अंबाती रायुडू यांनीही चांगली कामगिरी केली होती. पण धावांचा पाठलाग करताना किंवा अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करणारा सहाव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू भारताकडे नाही. त्यासाठी मधल्या फळीतील एका खेळाडूला अखेपर्यंत खेळपट्टीवर उभे राहावे लागेल. गोलंदाजीमध्ये इशांत शर्माने चांगले पुनरागमन करत चार विकेट्स मिळवल्या होत्या, तो यापुढेही कामगिरीमध्ये सातत्य राखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि डावखुरा युवा फिरकीपटू अक्षर पटेल यांनीही पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण वेगवान गोलंदाज वरुण आरोन आणि फिरकीपटू आर. अश्विन यांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही.
श्रीलंकेच्या गोलंदाजीची लक्तरे भारतीय फलंदाजांनी पहिल्या सामन्यात वेशीवर टांगली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताना त्यांना गोलंदाजीवर अधिक घाम गाळावा लागणार आहे. कर्णधार अँजेलू मॅथ्यूज, थिसारा परेरा आणि सूरज रणदीव यांना एकदिवसीय क्रिकेटचा अनुभव असला तरी अन्य गोलंदाज तसे नवखेच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी या दौऱ्यात बरेच काही शिकण्याची संधी असेल. फलंदाजीमध्ये तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या त्रिकुटावर श्रीलंकेची मुख्यकरून भिस्त असेल. त्यामुळे जर श्रीलंकेला सामना जिंकायचा असेल, तर या तिघांपैकी एकाला अखेपर्यंत झुंज द्यावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), महेला जयवर्धने, अशान प्रियंजन, निरोशन डिकवेला, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, लहिरू गमागे, चतुरंगा डीसिल्व्हा, सीकुगे प्रसन्ना, सूरज रणदीव.
सामन्याची वेळ : दु. २.३० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.