विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने सक्षमपणे भारतीय संघाचं नेतृत्व केलं. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर ३ गडी राखून मात करत आशिया चषकातलं आपलं सातवं विजेतेपद मिळवलं. सुरुवातीला विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करेल याविषयी शंका निर्माण झाली होती, मात्र रोहित आणि त्याच्या संघाने सर्व शंकांना चोख उत्तरं दिली आहेत. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर अतिक्रिकेटमुळे होणारा भार कमी करण्याविषयी चर्चा रंगायला लागली आहे. भारतीय संघाच्या वन-डे आणि टी-२० संघात बदल करायचे असल्यास रोहित शर्मा सध्याच्या घडीला योग्य उमेदवार असल्याचं समोर येतंय.

अवश्य वाचा – भारताकडून बांगलादेशी वाघांची शिकार, आशिया चषकावर भारताची ‘सत्ता’!

  • पहिलं कारण – रोहितवर जबाबदारी टाकल्यामुळे विराटच्या खांद्यांवरचा भार कमी होईल

गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी राहून फलंदाजीत सतत धावा करत राहणं ही गोष्ट नक्कीच साधी नाही. त्यातच गेल्या काही वर्षांमधध्ये भारतीय संघाच्या एकामागोमाग एक होत असलेल्या दौऱ्यांमुळे विराटवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे वन-डे, टी-२० संघाची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर टाकल्यास विराटचा खेळ अजुन बहरु शकेल.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : विजेतेपद हे आमच्या मेहनतीला मिळालेलं फळ – रोहित शर्मा

  • दुसरं कारण – कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी चांगली राहिली आहे

आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितला कर्णधारपद भूषवण्याची फारशी संधी मिळालेली नाही. मात्र आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाची झलक आपण पाहिलेली आहे. मुंबई इंडियन्स या आपल्या संघाला रोहित २०१३, २०१५ आणि २०१७ या ३ वर्षांमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणं या दोन भिन्न गोष्टी असल्या तरीही रोहितच्या पदरात आता चांगलाच अनुभव जमा आहे, याचा फायदा भारतीय संघाने घ्यायलाच हवा.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : तब्बल ५ वर्षांनी ‘टीम इंडिया’ने केला हा पराक्रम

  • तिसरं कारण – संघाचं नेतृत्व करत असताना रोहितचा खेळ खुलतो

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये रोहित शर्मा चाचपडत खेळायचा. मात्र २०१३ मध्ये आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितचा खेळ अमुलाग्र बदलला आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकातही रोहितच्या फलंदाजीत झालेला बदल सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी असल्यावर रोहितचा खेळ सुधारतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे.

  • चौथं कारण – रोहित सहकारी खेळाडूंवर विश्वास दाखवून संधी देतो

कर्णधार म्हणून विराट कोहली संघात अनेक बदल करतो, इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका हे याचं उत्तम उदाहरण आहे. यासाठी विराट कोहलीवर अनेकदा टीकाही झालेली आहे. याचसोबत संघाची निवड करतानाही विराट कोहलीचा इतिहास तितकासा चांगला नाही, मात्र रोहित शर्मा आपल्या सहकारी खेळाडूंवर विश्वास ठेऊन त्यांना एक संधी देण्यासाठी ओळखला जातो.

आशिया चषकात दुखापतीमधून सावरत पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला हाँग काँगविरुद्ध सामन्यात फारशी चमकदारी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे नवोदीत खलिल अहमदने पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी करुनही पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं, यावर अनेकांनी टीकाही केली. मात्र रोहितने भुवनेश्वर विश्वास टाकत त्याला संधी दिली, याचाच परिणाम म्हणून भुवनेश्वरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा किताब घेत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

  • पाचवं कारण – रणनिती आखण्यात रोहित विराटपेक्षा सरस

प्रत्यक्ष सामन्यादरम्यान गरजेनुसार संघाची रणनिती बदलणं ही रोहितच्या कर्णधारपदाची सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेकदा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात योग्य बदल न झाल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला फायदा झाल्याचं पाहण्यात आलं आहे. रोहित हा रणनिती आखण्याच्या दृष्टीकोनातून विराटपेक्षा काकणभर सरसच आहे.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : पाकिस्तानचे ‘बशीर चाचा’ रंगले भारतीय रंगात