मुंबई : वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या ‘वुमन्स रॅली टू द व्हॅली’ या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बुधवारी सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल ८७ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

वरळी ते अ‍ॅम्बी व्हॅली, पुणे येथे ७ एप्रिलला पार पडलेल्या या रॅलीत तब्बल ४०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. प्रज्ञा चावरकर आणि पारुल शाह यांच्या संघाने दुसऱ्या क्रमांकासह ५० हजार रुपयांचे बक्षिस मिळवले. विनिशा सिंग सावंत आणि अयोश्मिता बिस्वास यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला. मनीषा गेंद आणि मालू गुप्ता यांच्या संघाने चौथ्या क्रमांकावर मजल मारली तर काला चंद्रकांत सोनी आणि हिमानी शर्मा यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मल्लिका राय आणि नेहा खंडेलवाल यांनी सहावा क्रमांक पटकावला.

यावेळी महिला रॅलीच्या अध्यक्षा स्मिता दांडेकर यांनी सांगितले की, ‘‘आम्ही १९०४मध्ये नवी दिल्ली ते मुंबई अशी पहिली रॅली आयोजित केली होती. सेनादल, नौदल, हवाईदलातील तसेच पोलिसांच्या संघांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. आता आमची पुढील रॅली ८ मार्च २०२० रोजी होणार आहे.’’ या कार्यक्रमाला ‘विया’चे कार्याध्यक्ष नितीन डोसा हेसुद्धा उपस्थित होते.

फॉम्र्युला-४ राष्ट्रीय शर्यतीत सहभागी होणाऱ्या स्नेहा शर्माने यावेळी सांगितले की, ‘‘आपल्यापैकी प्रत्येक महिला ही ‘सुपरहिरो’ असून एकाच वेळी आई, मुलगी, पत्नी आणि व्यावसायिक ड्रायव्हर अशा भूमिका निभावत आहे. मी जेव्हा शर्यतीला सुरुवात केली, त्यावेळी महिला समानतेच्या बाबतीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याचबरोबर कुटुंबाचा पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ यामुळे माझी कारकीर्द धोक्यात आली होती. त्यामुळे महिलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, अशी विनंती करेन.’’