मराठमोळा शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर आणि टी. नटराजन यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार टिम पेन आणि कॅमरुन ग्रीन यांनी भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. टिम पेन यानं अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. मराठमोळ्या शार्दुल ठाकूरनं पेनला बाद करत भारताला दिवसातील पहिला बळी मिळवून दिला.

टिम पेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. टिम पेन याच्यानंतर कॅमरुन ग्रीनला सुंदरनं माघारी धाडलं. त्यानंतर लगेच पॅट कमिन्सला शार्दुलनं पायचीत बाद करत भारताला आठवं यश मिळवून दिलं. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायन यानं भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. लायन यानं ४ चौकारासह २४ धावा केल्या. अखेरीस सुंदरनं आपल्या जाळ्यात अडकवत लायनला तंबूत पाठवलं. त्यानंतर नटराजन यानं हेजलवूडलाही तंबूत झाडलं. ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या तीन फलंदाजांनी ५६ धावा जोडल्या. भारताकडून नटरान, शार्दुल आणि सुंदर यांनी प्रत्येकी तीन-तीन बळी घेतले. तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.


पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि हॅरीस झटपट बाद झाल्यानंतर स्मिथ-लाबुशेन यांनी संयमी फलंदाजी केली. स्मिथला ३६ धावांवर सुंदरनं बाद केलं. लाबुशेन-स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी ७० धावांची भागिदारी झाली. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडसोबत लाबुशेन यानं संघाची धावसंख्या वाढवली. मॅथ्यू वेड आणि लाबुशेन यांच्यामध्ये चौथ्या गड्यासाठी शतकी भागिदारी झाली. मॅथ्यू वेड ४५ धावांवर नटराजनचा शिकार ठरला. तर लाबुशेन याची १०८ धावांची खेळी नटराजन यानं संपुष्टात आणली.  पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या होत्या.