भारतीय संघानं पहिल्या डावांत उभारलेल्या ३२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली आहे. उपहारापर्यंत इंग्लंड संघानं १८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप २९० धावांनी पिछाडीवर आहे. फिरकीपटू आर. अश्विन यानं महत्वाचे दोन बळी घेत इंग्लंडला अडचणीत टाकलं आहे.

चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ८ गडी बाद झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे चार आणि इंग्लंड संघाचे चार फलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं रॉरी बर्न्स याला बाद करत इशांत शर्मानं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. तर आर. अश्विन यानं सिब्ली आणि लॉरेन्स यांना बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं जो रुट याला बाद करत इंग्लंडचं कंबरडं मोडलं आहे.

दरम्यान,  दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अक्षर पटेल लगेच तंबूत परतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. दुसऱ्या दिवशी २९ धावांत भारतानं चार गडी गमावले. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत होता. मात्र, त्याला एकाही फलंदाजांनी साथ दिली नाही. पहिल्या दिवशी ३३ धावांवर नाबाद असणाऱ्या ऋषभ पंतनं दुसऱ्या दिवशी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीनं सर्वाधिक चार बळी घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन यानं तीन बळी घेत भारतीय संघाला अडचणीत टाकलं. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक विकेट मिळाली.

चेपॉकच्या आव्हानात्मक खेळपट्टीचे दडपण झुगारत पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी १६२ धावांची भागिदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. पहिल्या कसोटीत अपयशी ठरणाऱ्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने धावांची गोडी दाखवत मोठ्या खेळीची संघाची अपेक्षा पूर्ण केली. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि पंत यांचा अपवाद वगळता एकाही फंलदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजाराला (२१) चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विराट कोहली, शुबमन गिल, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांना खातेही उघडता आलं नाही. अश्विन यानं १३ धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर अक्षर पटेल अवघ्या ५ धावांवर बाद झाला.