टोक्यो ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या परदेशी संघांचे आदरातिथ्य करण्यास जपानमधील शेकडो गावे आणि शहरांनी नकार दिल्यामुळे संयोजकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उपाययोजना राबवण्यात मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिकपूर्वीच्या सराव शिबिरासाठी ओकुइझुमो या पश्चिमेकडील शहराला ५० लाख डॉलरचा खर्च करावा लागणार होता. पण करोनामुळे हा दौरा रद्द करावा लागला आहे. खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवणे, त्यांची करोना चाचणी आणि वैद्यकीय सोयीसुविधा उभारण्याकरिता बराच खर्च येणार होता. शहरातील नागरिकांना जगातील अव्वल खेळाडूंना भेटता यावे, नवा खेळ शिकता यावा, यासाठीचा हा उपक्रम राबविण्यात येणार होता.

दक्षिण मियागीमधील कुरिहारा शहरानेही दक्षिण आफ्रिका हॉकी संघाला निमंत्रित करण्याची योजना आखली होती. पण करोनामुळे अनेक बंधने आल्याने हा दौरा रद्द करावा लागला. जगातील अनेक संघांनीही करोनाचा धोका लक्षात घेता अशा प्रकारचे दौरे करणे टाळले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जलतरण संघाने निगाटाच्या नागोआका शहरामध्ये होणारा आपला दौरा रद्द केला आहे. त्याचबरोबर नागानोच्या ओकाया शहरामध्ये येण्यास कॅनडाच्या टेबल टेनिस संघाने नकार दर्शवला आहे.

जपानमधील अनेक शहरांनी परदेशी संघांचे प्रदर्शनीय दौरे आयोजित करण्यास नकार दर्शवला असला तरी दक्षिण यामागाटामधील सुरुओका शहराने मोल्डोवा आणि जर्मनीतील ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. यासाठी सुरुओका शहराने मोल्डोवाशी अनेक वर्षांपासून करार केला होता. ‘‘दोघांमध्ये खेळासहित अन्य गोष्टींची देवाणघेवाण होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. पैसे खर्च न करताही काही उपक्रम राबवले जाऊ शकतात,’’ असे शहरातील शिक्षण विभागाचे पदाधिकारी ताकायुकी इटो यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या ऑलिम्पिकपात्र खेळाडूंचे प्राधान्याने लसीकरण

सिडनी : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना लसीकरणात स्थान देण्यात आले आहे, असे मंगळवारी ऑस्ट्रेलियातील शासनाने स्पष्ट केले आहे. या प्राधान्यगटात एकूण दोन हजार जणांचा समावेश असून यापैकी ४५०-४८० खेळाडू असतील.