अनधिकृत बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि एन. श्रीनिवासन यांच्याविरोधातील अभियानाचे प्रमुख आदित्य वर्मा यांनी भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
राज्यातील युवा क्रिकेटपटूंना मदत करावी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी वर्मा यांनी पत्रात केली आहे.
मोदी यांनी मध्यस्थी करून राज्यात क्रिकेटला चालना मिळण्यासाठी प्रभारी क्रिकेट असोसिएशन स्थापन करावी, अशी मागणी वर्मा यांनी पत्रात केली आहे. शेजारच्या झारखंडने कपटनीतीने मान्यता मिळवली आहे, असा अरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचारमुक्त  बीसीसीआयसाठी मोदी यांनी पुढे यावे, असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.
‘‘बीसीसीआयच्या कारभाराकडे तुम्ही लक्ष दिले नाही तर ही संघटना कुणीच वाचवू शकणार नाही. श्रीनिवासन आणि त्यांच्या विश्वासातील काही क्रिकेट संघटनांनी बीसीसीआयला आपल्या दावणीला बांधले होते, परंतु आताही अनधिकृत कारवाया करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन ते करीत आहेत,’’ असे वर्मा यांनी म्हटले आहे.