मोहन बागान संघातील दोन खेळाडूंना करोनाची बाधा

नवी दिल्ली : प्रबिर दास आणि एसके साहिल या एटीके मोहन बागानच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने मालदीव येथे होणारे एएफसी चषक स्पर्धेचे सामने अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले आहेत.

ड गटातील सामन्यांसाठी एटीके मोहन बागानचा संघ मालदीवला रवाना होणार होता. त्याआधी सर्व खेळाडूंची कोलकाता येथील खासगी रुग्णालयांमध्ये करोना चाचणी केल्यानंतर, या दोघांचा अहवाल सकारात्मक आला. आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) नियमानुसार, रवाना होण्याच्या दोन दिवसआधी सहभागी खेळाडूंचा करोना अहवाल नकारात्मक येणे बंधनकारक आहे.

एटीके मोहन बागानचा संघ सोमवारी मालदीवला रवाना होणार होता. पण आता स्पर्धाच लांबणीवर टाकल्याने त्यांनी आपली योजना रद्द केली आहे. ‘‘एएफसी चषकातील साखळी लढती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. एएफसी हे सहभागी क्लब्स आणि अधिकाऱ्यांशी संपर्कात असून मालदीवमध्ये दाखल न झालेल्या संघांनी या देशात प्रवेश करू नये,’’ असेही ‘एएफसी’च्या पत्रकात म्हटले आहे.

एटीके मोहन बागानचा पहिला सामना १४ मे रोजी होणार होता. त्यांचा कर्णधार रॉय कृष्णा सलामीच्या लढतीआधी फिजी येथून थेट मालदीवला पोहोचणार होता.

बेंगळूरुच्या खेळाडूंना मालदीव सोडण्याची ताकीद

बेंगळूरु एफसीच्या फुटबॉलपटूंनी करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना मालदीव सोडण्याची ताकीद देण्यात आली आहे. मात्र ईगल्स एफसीविरुद्ध त्यांची लढत होण्याआधीच संपूर्ण ड गटातील लढती लांबणीवर टाकण्याचा निर्णय आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) घेतला आहे. मात्र हे सामने लांबणीवर टाकण्याचे कोणतेही ठोस कारण ‘एएफसी’ने दिलेले नाही, पण आशियाई देशांमध्ये करोनाचा वाढता कहर, हे त्यामागचे मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. ‘‘बेंगळूरु एफसीच्या खेळाडूंचे कृत्य स्वीकारार्ह नाही. असे कृत्य आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे बेंगळूरु एफसीच्या खेळाडूंनी मालदीव सोडून जावे. आम्ही त्यांचा सामना आयोजित करणार नाही. त्यांच्या निघून जाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’’ असे मालदीवचे क्रीडामंत्री अहमद महलूफ यांनी म्हटले आहे. बेंगळूरु एफसीचा ऑस्ट्रेलियाचा फुटबॉलपटू मालदीवची राजधानी माले येथील रस्त्यांवर फिरतानाचे छायाचित्र अनेक प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले आहे. बेंगळूरु एफसीचे मालक पार्थ जिंदाल यांनी करोना नियमांचा भंग करणाऱ्या खेळाडूंविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. खेळाडूंच्या वतीने माफी मागताना जिंदाल म्हणाले की, ‘‘भविष्यात आमच्या खेळाडूंकडून असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन मी देतो. आमच्या तीन ते चार परदेशी खेळाडूंकडून झालेले हे कृत्य असमर्थनीय आहे.’’