तिसऱ्या दिवशी सिडनी कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियानं आपलं निर्वादित वर्चस्व राखलं आहे. दुसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या कांगारुंनी तिसऱ्या दिवशी जोरदार प्रतिहल्ला करत सामन्यावर वर्चस्व राखलं आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. त्यानंतर सयंमी पण आक्रमकपणे फलकावर १०३ धावा उभा केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रुपानं ऑस्ट्रलियाला दोन झटके बसले. मात्र, तिसऱ्या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी भारताला आणखी विकेट दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन ४७ तर स्मिथ २९ धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद २८ धावांची खेळी केली.

भारताचे तीन फलंदाज धावबाद –

भरातीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघानं वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफलातून क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन केलं. कांगारुंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केलं. यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमराह (००) यांचा समावेश आहे.

पंत-जाडेजा दुखापतग्रस्त

पहिल्या डावात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजाला दुखपत झाली आहे. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी दोघेही मैदानात उतरले नव्हते. जाडेजाच्या जागी मयांक अगरवाल आणि पंतच्या जागी वृद्धीमान साहा क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. स्कॅन केल्यानंतर पंत-जाडेजा यांच्या दुखापतीबाबत समजले. याआधी इशांत, शमी, केएल. राहुल आणि उमेश यादव दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकले आहे. त्यात या दोघांच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाल्याचं चित्र आहे.