इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाची आघाडीची आणि मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि त्यांची ९ बाद ११७ अशी केविलवाणी अवस्था झाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आता आरामात गुंडाळून सुखाने भोजन घेता येईल, या विचारात इंग्लिश संघनायक अ‍ॅलिस्टर कुक होता. परंतु आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात खेळणाऱ्या अ‍ॅश्टन अगर याला हे मुळीच मंजूर नव्हते. त्याने फिलिप ह्य़ुजेसच्या साथीने अखेरच्या विकेटसाठी झुंजारपणे किल्ला लढवला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ६५ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर उत्तरार्धात इंग्लंडने दुसऱ्या डावात २ बाद ८० अशी मजल मारली. ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस यामुळेच उत्कंठावर्धक ठरला.
११व्या स्थानावर फलंदाजीला उतरलेला अगर पदार्पणातच शतकाकडे कूच करत होता. परंतु दुर्दैवाने शतकापासून दोन धावांच्या अंतरावर असताना तो बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ग्रॅमी स्वानने मिडविकेटला त्याचा सुरेख झेल घेतला. अगरने १०१ चेंडूंत १२ चौकार आणि २ षटकारांनिशी ९८ धावा केल्या. परंतु त्याआधी अगरने तीन विक्रम मोडित काढले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २८० धावा उभारता आल्या. अगरने ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सर्वाधिक वैयक्तिक धावा आणि पदार्पणात सर्वाधिक धावा हा विश्वविक्रम प्रस्थापित केला. याचप्रमाणे फिलिप ह्य़ुजेसच्या साथीने दहाव्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी रचून आणखी एक विश्वविक्रम मोडित काढला.
डावखुरा फिरकी गोलंदाज अगरच्या गाठीशी पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून फक्त १० प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव होता. त्याची अ‍ॅशेससारख्या महत्त्वाच्या स्पध्रेतील निवडसुद्धा क्रिकेटजगतात आश्चर्यकारक मानली जात होती. परंतु पदार्पणाच्याच सामन्यात १९ वर्षीय अगर डगमगला नाही. त्याने सात चौकार आणि एका षटकारासह आपले अर्धशतक झळकावले. खेळपट्टीवर सकाळपासूनच टिकाव धरणाऱ्या ह्य़ुजेसने साथ दिली. ह्युजेसने १३१ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ८१ धावा काढल्या. जेम्स अँडरसनने इंग्लिश आक्रमणाची धार दाखविताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावले. त्याने ८५ धावांत ५ बळी घेतले.
मग इंग्लंड संघाने आपला दुसरा डाव सुरू केला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे ८वे षटक महत्त्वाचे ठरले. त्याने सलामीवीर जो रूट (५) आणि जोनाथन ट्रॉट यांना तंबूची वाट दाखवत इंग्लंड संघाची २ बाद ११ अशी अवस्था केली. मग कुक आणि पीटरसन यांनी अतिशय सावध आणि संयमाने खेळून ३५ षटके खेळून काढली. या दोघांनी ६९ धावांची भागीदारी रचली. कुकने १३० चेंडूंत चार चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर केव्हिन पीटरसनने ९८ चेंडूंत सहा चौकारांनिशी नाबाद ३५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : २१५,
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ६४.५ षटकांत सर्व बाद २८० (स्टीव्हन स्मिथ ५३, फिलिप ह्य़ुजेस नाबाद ८१, अश्टन अगर ९८; जेम्स अँडरसन ५/८५)
इंग्लंड (दुसरा डाव) : ४३ षटकांत २ बाद ८० (अ‍ॅलिस्टर कुक नाबाद ३७, केव्हिन पीटरसन नाबाद ३५; मिचेल स्टार्क २/१५)
अगरचे विश्वविक्रम
* ११व्या स्थानावरील फलंदाजाचा पदार्पणातील सर्वाधिक धावांचा १११ वर्षांचा जुना विक्रम अगरने मोडला. १९०२मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू वार्विक आर्मस्ट्राँगने इंग्लंडविरुद्ध नाबाद ४५ धावा काढल्या होत्या.
*  अगरने ११व्या स्थानावर फलंदाजीला उतरून सर्वाधिक धावा काढताना टिनो बेस्टचा मागील हंगामातील विक्रम मागे टाकला. बेस्टने इंग्लंडविरुद्धच एजबस्टन येथे ९५ धावांची खेळी साकारली होती.
* अगरने फिलिप ह्य़ुजेसच्या सोबत दहाव्या विकेटसाठी विश्वविक्रमी १६३ धावांची भागीदारी रचली. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रायन हॅस्टिंग्स आणि रिचर्ड कॉलिंगे यांच्या नावावर होता. १९७३मध्ये ऑकलंडमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम झाला होता. त्यानंतर १९९७मध्ये पाकिस्तानच्या अझर मेहमूद आणि मुश्ताक अहमद यांनी रावळपिंडी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या विक्रमाची बरोबरी केली होती.