अहमदनगर चेकर्स संघाने मुंबई मूव्हर्स संघावर ४-२ असा विजय मिळवीत अमानोरा करंडक महाराष्ट्र बुद्धिबळ लीगमध्ये उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.
पीवायसी जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील चौथ्या फेरीअखेर नगर संघाने तेरा गुणांसह आघाडी स्थान राखले आहे. पुणे ट्रमास्टर्स संघाने १२.५ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. जळगाव बॅटलर्स, ठाणे कॉम्बॅटन्ट्स व पुणे अॅटॅकर्स यांचे प्रत्येकी बारा गुण झाले आहेत.
नगर संघाने मुंबईविरुद्ध सहज विजय मिळविला, त्या वेळी त्यांच्याकडून शार्दूल गागरे, ऋचा पुजारी व एन. आर. विग्नेश यांनी अनुक्रमे वैभव सुरी, विक्रमादित्य कुलकर्णी व राकेश कुलकर्णी यांच्यावर मात केली. नगरच्याच एम. शामसुंदर याने अव्वल दर्जाची खेळाडू कोनेरू हम्पी हिला बरोबरीत रोखून आश्चर्याचा धक्का दिला. मात्र नगरच्या आकांक्षा हगवणे हिला शाल्मली गागरे हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
ठाणे संघाने पुणे ट्रमास्टर्सविरुद्ध ३.५-२.५ असा विजय मिळविला. या सामन्यात त्यांच्या एम. ललित बाबू, के. रत्नाकरन व अरविंद चिदंबरम यांनी अनुक्रमे स्वाती घाटे, मेरी अॅन गोम्स व स्वयंम मिश्रा यांना हरविले. ठाण्याची खेळाडू सौम्या स्वामिनाथन हिला आपले प्रशिक्षक अभिजित कुंटेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. सौम्याची सहकारी ईशा करवडे हिला एस. पी. सेतुरामन याने हरविले. अभिमन्यू पुराणिक (ठाणे) व अभिषेक केळकर (पुणे ट्रमास्टर्स) यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.
पुणे अॅटॅकर्सच्या एम. आर. व्यंकटेश व एम. तेजकुमार यांनी अनुक्रमे किरण मनीषा मोहंती व ऋजुता बक्षी यांना हरविले, मात्र त्यांच्या पर्णाली धारिया व पद्मिनी राऊत यांना अनुक्रमे श्रीनाथ नारायण व बी. अधिबन यांच्याविरुद्ध हार मानावी लागली.  पुण्याच्या अनिरुद्ध देशपांडे याने महंमद शेख याला बरोबरीत रोखले. शेवटच्या निर्णायक लढतीत ठाण्याच्या स्वप्निल धोपाडे याने ग्रँडमास्टर विदित गुजराथी याला बरोबरीत रोखून अनपेक्षित धक्का दिला.