दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ांनुसार आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आपली गोलंदाजी शैली बदलावी, असे मत भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे.

‘‘अश्विन आणि जडेजा यांच्यामध्ये भारताबरोबर परदेशातही चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. पण भारतामध्ये गोलंदाजी करताना तुम्हाला ठरावीक पद्धतीने मारा करावा लागतो. पण मोइन अली आणि नॅथन लियॉन या फिरकीपटूंनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्या शैलीने गोलंदाजी केली ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे,’’ असे अजिंक्य म्हणाला.

अश्विन आणि जडेजा यांच्याबाबत अजिंक्य पुढे म्हणाला की, ‘‘सध्याच्या घडीला अश्विन आणि जडेजा हे चांगली गोलंदाजी करत आहेत. परदेश दौऱ्यांत चांगली कामगिरी ते करू शकतात. पण त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये बदल केला तर त्यांना परदेश दौऱ्यांमध्ये अधिक चांगले यश मिळवता येऊ शकेल. खेळपट्टीनुसार कशी गोलंदाजी करायचे हे त्यांनी आत्मसात केले तर नक्कीच त्यांना मोठे यश मिळू शकेल.’’

 शास्त्रींमुळे सकारात्मकता आली

रवी शास्त्री तुमच्याबरोबर असतील तर तुमच्यामध्ये अधिक सकारात्मकता येते. ते प्रत्येक खेळाडूला नेहमी पाठिंबा देतात. क्रिकेटचा आनंद लुटा, हेच ते नेहमी सांगत असतात. एखाद्या खेळाडूची चांगली कामगिरी होत नसेल तर त्याचे मनोबल कसे उंचावले जाईल, ही जबाबदारी शास्त्री चोखपणे निभावतात, असे अजिंक्यने सांगितले.

विराटचे नेतृत्व महत्त्वाचे

संघातील प्रत्येक खेळाडूसाठी विराट कोहलीचे नेतृत्व महत्त्वाचे ठरत आहे. त्याने कधीही कामगिरी किंवा निकाल, याचे दडपण आमच्यावर टाकलेले नाही. तुम्ही मैदानात जाऊन बिनधास्तपणे खेळा, असेच तो नेहमी म्हणत असतो. त्याच्या या नेतृत्वगुणामुळे संघात चांगले वातावरण आहे, असे अजिंक्य म्हणाला.