भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा वाहणारा अजिंक्य रहाणे त्याच्यावर नेतृत्वपदाचे अतिरिक्त दडपण येऊ देणार नाही, असे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. अ‍ॅडलेड येथे प्रकाशझोतात खेळल्या जाणाऱ्या या कसोटीत भारताचे नेतृत्व केल्यानंतर कोहली पितृत्वाच्या रजेनिमित्त मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन कसोटींमध्ये उपकर्णधार रहाणेच संघाचे नेतृत्व करणार, हे जवळपास निश्चित आहे.

‘‘रहाणेवर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण असेल, असे मला वाटत नाही. त्याने यापूर्वीही दोन कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व केले असून दोन्ही वेळेस संघाने यश मिळवले आहे. या स्थितीत रहाणे कर्णधारपदाचे दडपण येऊ देणार नाही,’’ असे ७१ वर्षीय गावस्कर म्हणाले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७मध्ये धरमशाला येथील लढतीत ऑस्ट्रेलियाला, तर २०१८मध्ये बेंगळूरु येथील कसोटीत अफगाणिस्तानला धूळ चारली होती.

‘‘रहाणेला स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित करतानाच संघालाही योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करायचे आहे. त्याला स्वत:च्या मर्यादा आणि क्षमतांची जाणीव असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धही तो कर्णधार म्हणून छाप पाडेल. मात्र त्याला फलंदाजीबरोबरच कर्णधारपदाचाही आनंद लुटण्याची मोकळीक द्यावी,’’ असेही गावस्कर यांनी नमूद केले.

दरम्यान भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अष्टपैलू मोझेस हेन्रिक्सचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज सीन अबॉटला मात्र स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीला मुकावे लागणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.