भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने, BCCI च्या निवडसमिती सदस्यासाठी अर्ज केला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अजित आगरकरने ही माहिती दिली. बीसीसीआयच्या नवीन संविधानातील तरतुदींनुसार, निवड समितीच्या सदस्यांसाठी Zonal Representation चा निकष काढून टाकण्यात आला आहे. ज्यामुळे अजित आगरकरचं नाव निवडसमिती प्रमुखाच्या शर्यतीत आता आघाडीवर आलं आहे. आगरकरला माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचं आव्हान असणार आहे.

याआधी अजित आगरकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडसमिती प्रमुखपदावर काम केलेलं आहे. आगरकरने आतापर्यंत २६ कसोटी, १९१ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचसोबत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आगरकरच्या नावावर ३४९ बळी जमा आहेत. त्यामुळे निवडसमिती प्रमुखपदी आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एम.एस.के. प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन जागांसाठी आपला अर्ज दाखल करण्यासाठी २४ जानेवारी ही अखेरची तारीख होती. दरम्यान प्रसाद आणि खोडा यांच्याव्यतिरीक्त शरणदीप सिंह, जतीन परांजपे आणि देवांग गांधी हे ३ सदस्य निवड समितीवर काम पाहत आहेत.