मराठमोळ्या शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला आहे. शार्दूल ठाकूर आणि सुंदर यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघानं २५० धावांचा टप्पा पार केला आहे. आघाडीचे सहा फलंदाज बाद झाल्यानंतर या जोडीनं सातव्या गड्यासाठी नाबाद ६७ धावांची भागिदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. भारताच्या डावातील ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. शिवाय ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या गड्यासाठी झालेली ही सर्वोत्कृष्ट भागिदारीही ठरली आहे.

गोलंदाजीत कमाल करणाऱ्या शार्दुल-सुंदर यांनी फलंदाजीतही आपला करिश्मा दाखवला आहे. शार्दुल-सुंदरनं १२४ चेंडूचा सामना करताना ६७ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ऋषभ पंत आणि मयांक अगरवाल बाद झाल्यानंतर सुंदर-शार्दुलनं डाव सावरला. तिसऱ्या सत्रात भारतीय संघानं २७ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्या ९२ धावा चोपल्या आहेत. सध्या शार्दुल ठाकूर ३३ आणि वॉशिंगटन सुंदर ३८ धावांवर खेळत आहे. भारतीय संघानं ८७ षटकानंतर सहा गड्यांच्या मोबदल्यात २५३ धावा केल्या आहेत. भारताकडे चार गडी बाकी असून अद्याप ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात खराब झाली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी पहिल्या सत्रात माघारी परतली. पहिल्या सत्रानंतर भारतीय संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा करणारा भारतीय संघानं दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलच मयांक अगरवाल आणि ऋषभ पंतची विकेट गमावली. भारतीय संघ २०० धावांपर्यंत मजल मारणार का? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला होता. मात्र, शुर्दुल ठाकूर आणि सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाचा डाव सावरला आहे.