‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटमध्ये ‘अशक्य’ या शब्दाला थारा नाही, हीच अस्सल अनुभूती आयपीएलच्या सातव्या मोसमातील अखेरच्या थरारक सामन्याने दिली. १४.३ षटकांत धावसंख्या समान झाल्यामुळे पुढील चेंडूवर चौकार मारण्याचे आव्हान मुंबई इंडियन्सपुढे होते. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या जेम्स फॉल्कनरच्या त्या चेंडूवर मुंबईकर आदित्य तरेने षटकार खेचून गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या अशक्यप्राय विजयावर शिक्कामोर्तब केले. मग तरेने त्याच आवेशात धावत आपला आनंद साजरा केला. क्षणार्धात अँडरसन, सचिनसह मुंबईचा अख्खा संघ या जल्लोषात सामील झाला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ओळीने पाच पराभवानिशी आयपीएल मोसमाला प्रारंभ करणाऱ्या मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या बालेकिल्ल्यावर ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्याची किमया साधली. फक्त ४४ चेंडूंत ९ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ९५ धावांची घणाघाती खेळी साकारणारा कोरे अँडरसन हा मुंबईच्या या अशक्यप्राय विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नसते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.राजस्थान रॉयल्सने ‘प्ले-ऑफ’चे स्वप्न साकारण्यासाठी मुंबईपुढे १४.३ षटकांत १९० धावांचे आव्हान ठेवले होते, तेव्हा मुंबई इंडियन्स जिंकणार यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. परंतु ‘हारी बाजी को जीतना हमें आता है..’ हा विश्वास मुंबई इंडियन्सने तमाम मुंबईकरांच्या साक्षीने सार्थ ठरवला. ३६ चौकार आणि २२ षटकारांची या सामन्यात आतषबाजी झाली आणि क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मुंबई इंडियन्सकडून अँडरसन आणि अंबाती रायुडू (३०) यांनी पाचव्या विकेटसाठी ५१ चेंडूंत ८१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. याच भागीदारीने मुंबईचा विजय दृष्टीपथास आला.
त्याआधी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय सुरुवातीच्या काही षटकांत तरी अनुकूल ठरला, परंतु त्यानंतर राजस्थान रॉयल्सने ४ बाद १८९ अशी धावसंख्या रचून तो सपशेल फोल ठरवला. अजिंक्य रहाणेऐवजी संजू सॅमसनला सलामीला पाठविण्याची  राजस्थानची चाल अतिशय यशस्वी ठरली. कर्णधार शेन वॉटसनने (८) निराशा केल्यावर सॅमसनने करुण नायरच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी धावांची भागीदारी करून राजस्थानच्या धावांचा वेग वाढवला. सॅमसनने ४७ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह आपली ७४ धावांची खेळी साकारली, तर करुण नायरने २७ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांनिशी ५० धावा केल्या. सॅमसन आणि नायर लागोपाठच्या षटकांमध्ये तंबूत परतल्यावरही रहाणेला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर ब्रॅड हॉज (नाबाद २९) आणि जेम्स फॉल्कनर (२३) यांनी अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये चौथ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून संघाला
मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचे योगदान
दिले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ४ बाद १८९ (संजू सॅमसन ७४, करुण नायर ५०, ब्रॅड हॉज नाबाद २९, जेम्स फॉल्कनर २५; जसप्रित बुमराह १/३०) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १४.४ षटकांत ५ बाद १९५ (कोरे अँडरसन नाबाद ९५, अंबाती रायुडू ३०, माइक हसी २२; केव्हॉन कुपर २/३८)
सामनावीर : कोरे अँडरसन.

‘प्ले-ऑफ’चे वेळापत्रक
तारीख     सामना                       संघ        स्थळ
२७ मे      क्वालिफायर-१    किंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता    इडन गार्डन्स, कोलकाता
२८ मे      एलिमिनेटर    चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स    ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
३० मे      क्वालिफायर-२    (क्वालिफायर-१ पराभूत वि. एलिमिनेटर विजेता)    वानखेडे स्टेडियम, मुंबई
१ जून     अंतिम फेरी            एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू