यूएस ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अँजेलिक कर्बरने कॅरोलिन प्लिसकोव्हाचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. कर्बरने कॅरोलिनचा ६-३, ४-६. ६-३ ने पराभव केला असून कर्बरचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे.
यूएस ओपनच्या अंतिम फेरीत कर्बरचा सामना चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिन प्लिसकोव्हाशी होता. पहिल्या सेटमध्ये कर्बरने सहजरित्या कॅरोलिनावर मात केली. पण दुस-या सेटमध्ये कॅरोलिनाने पुनरागमन केले आणि कर्बरवर मात केली. दोघींनी एक एक सेटमध्ये विजय मिळवल्याने सामना चुरशीचा झाला. तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये कर्बरने दर्जेदार खेळाचा नजराणा सादर करत कॅरोलिनाला धूळ चारली. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनपाठोपाठ आता यूएस ओपनमध्येही कर्बरने बाजी मारली आहे. एका वर्षात दुस-यांदा ग्रँड स्लॅम पटकावण्याचा आनंद आहे. माझ्या कारकिर्दीतले हे सर्वोत्तम वर्ष आहे अशी प्रतिक्रिया कर्बरने दिली. पाच वर्षांपूर्वी मी न्यूयॉर्कमधून सुरुवात केली. त्यावेळी मी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये होती आणि आज माझ्या हातात यूएस ओपनचे चषक आहे असेही तिने सांगितले.
मी लहान असल्यापासून ग्रँड स्लॅम जिंकणे आणि टेनिस रँकींगमध्ये अव्वल स्थान गाठणे हे माझे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असे सांगताना कर्बर भावूक झाली होती. १९९६नंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी कर्बर पहिलीच जर्मन खेळाडू होती. स्टेफी ग्राफव्यतिरिक्त अव्वल स्थानी झेप घेणारी कर्बर जर्मनीची केवळ दुसरी महिला टेनिसपटू आहे.
यूएस ओपनच्या सेमी फायनलमध्ये प्लिसकोव्हाने सेरेना विल्यम्सचा पराभव केला होता. या पराभवामुळे सेरेना विल्यम्सला अव्वल स्थान गमवावे लागले. सलग १८७व्या आठवड्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहण्याची सेनेराची संधी या पराभवामुळे संपुष्टात आली होती. यूएस ओपनमध्ये प्लिसकोव्हाचा पराभव केल्यानंतर कर्बर कोर्टवर एकच जल्लोष केला. प्रशिक्षकाचे आभार व्यक्त करुन कोर्टवर परतत असताना कर्बरचे डोळे पाणावले होते.
आजचा सामना अविस्मरणीय होता. माझ्यासाठी खेळणे काहीसे कठीण झाले होते. मला विजय मिळवता आला नाही. पण गेल्या तीन आठवड्यात मी ज्या पद्धतीने खेळ केला त्यावर मी समाधानी आहे अशी प्रतिक्रिया प्लिसकोव्हाने दिली आहे. अँजिने ती सर्वोत्तम असल्याचे सिद्ध केले. तिच्याविरुद्ध खेळणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असे सांगत प्लिसकोव्हाने तिच्यातल्या खेळाडूवृत्तीचे दर्शनही घडवले.