भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक असणारे अनिल कुंबळे यांच्या खांद्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने महत्वाची जबाबदारी टाकली आहे. यंदाच्या विश्वचषकामधील अंतिम सामन्याचा निर्णय ज्या षटकार आणि चौकारांच्या नियमाने लावण्यात आला त्या नियमासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयसीसीने कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये या वादग्रस्त निर्णयावर चर्चा होणार असल्याची माहिती आयसीसीचे संस्थापक जेफ अलार्डिस यांनी दिली.

‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ज्या ज्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले त्या सर्व नियमांवर या समितीच्या पुढच्या बैठकीमध्ये चर्चा होईल,’ असं आलर्डिस यांनी सांगितले. ही बैठक २०२० च्या पहिल्या तिमाहीत होणार आहे.

‘आयसीसी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सामन्यांमध्ये २००९ पासून टाय झालेल्या समान्यांचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरची संकल्पना वापरली जाते. सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यास त्या सामन्यामधील आकडेवारीमधूनच अंतिम विजेता ठरवणे गरजेचे असते. त्यामुळेच त्या समान्यात किती चौकार मारण्यात आले यावरुन विजेता ठरवला जातो,’ असं आलर्डिस म्हणाले.

लॉर्डसच्या मैदानात १४ जुलै रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्याचा निकाल चौकारांच्या मदतीने लावण्यात आल्यानंतर आयसीसीच्या नियमांवर टिका झाली होती. या सामन्यामध्ये इंग्लंडने २२ चौकार आणि २ षटकार लगावले होते तर न्यूझीलंडच्या नावावर सामना सुपर ओव्हरमध्येही अनिर्णित ठरला तेव्हा १७ चौकार होते. याच आकडेवारीच्या आधारे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले.

‘जगभरातील सर्वच टी-२० स्पर्धांमध्ये सुपर ओव्हमध्येही सामना अनिर्णित राहिल्यावर चौकार-षटकारांच्या आधारेच निकाल लावला जातो. आम्हाला सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सुपर ओव्हर संदर्भात एकाच प्रकारचे नियम वापरायचे आहेत. त्यामुळेच हे नियम कायम ठेवावेत की बदलावेत यासंदर्भात समितीच्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेतला जाईल,’ अशी माहिती आलर्डिस यांनी दिली.

जर सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला होता तर विश्वचषक विभागून द्यायला हवा होता असं मत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर अनेकांनी व्यक्त केलं. मात्र आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीच्या बैठकीत यावर काहीच चर्चा झाली नाही. ‘विश्वचषक विभागून देण्यासंदर्भात कोणतीच चर्चा झाली नाही. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा एकच विजेता असायलाच हवा अशी सर्वांची भूमिका आहे. मागील तीनही विश्वचषकांमध्ये सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली गेली आहे,’ असं आलर्डिस म्हणाले.