आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये नेपाळच्या अंजली चंद हिने धमाकेदार कामगिरी केली. मालदीव्स या संघाविरोधात खेळताना तिने एकही धाव न देता एकूण सहा बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मालदीव्स संघाविरूद्ध खेळताना केवळ १३ चेंडूंमध्ये अंजलीने ६ बळी टिपले. फिरकीपटू अंजलीने केलेली ही कामगिरी पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या टी २० क्रिकेट कारकिर्दीत मिळून सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिने मालदीव्सच्या संघाचे ६ बळी शून्यावर माघारी धाडले. त्यातही तिने तीन खेळाडूंना पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय तिने शेवटचे तीन बळी हे हॅटट्रिकच्या स्वरूपात टिपले.

अंजलीने ही दमदार कामगिरी करताना मलेशियाच्या खेळाडूचा विक्रम मोडला. चीनच्या संघाविरूद्ध खेळताना मलेशियाच्या मास एलिसा हिने टी २० क्रिकेटमधील दमदार विक्रम आपल्या नावे केला होता. तिने सहा धावा देऊन ३ बळी टिपले होते. तो विक्रम आज अंजली चंद हिने शून्य धावात सहा बळी घेऊन मोडला.

पुरूष टी २० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम भारताच्या दीपक चहरच्या नावावर आहे. त्याने बांगलादेशविरूद्ध नोव्हेंबर २०१९ मध्ये ७ धावांत ६ बळी टिपले होते. त्यावेळी त्याने शेवटच्या तीन चेंडूंवर हॅटट्रिकदेखील घेतली होती.

अंजली चंद हिने केलेली कामगिरी केवळ टी २० क्रिकेटमध्येच नव्हे तर तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तिच्या कामगिरीसह मालदीव्सचा डाव केवळ १६ धावांत आटोपला. १० षटकात त्यांचा डाव संपला. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने अवघ्या ५ चेंडूत सामना जिंकला.