१० नोव्हेंबरला आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीला यंदा भारताच्या टी-२० संघात स्थान मिळालं आहे. परंतू दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे संघातलं आपलं स्थान गमावून बसण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वरुण चक्रवर्तीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीचा त्याच्या गोलंदाजीवर काहीही परिणाम होणार नसला तरीही त्याला बॉल फेकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आयपीएलदरम्यान वरुणला ही दुखापत झाली होती. परंतू KKR च्या टीम मॅनेजमेंटने वरुणच्या या दुखापतीबद्दल टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांना नंतर माहिती दिल्यामुळे त्याच्या दुखापतीबद्दल निवड समितीला माहितीच नसल्याचं समोर येत आहे.

आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. वरुण चक्रवर्ती भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही याबद्दलचा निर्णय निवड समिती घेणार असल्याचं कळतंय. वरुण चक्रवर्तीव्यतिरीक्त वृद्धीमान साहालाही हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाल्यामुळे त्याच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.