डॉ. प्रकाश परांजपे
झब्बू, मेंढीकोट, गुलाम-चोर इत्यादी पत्त्यांचे अनेक खेळ केवळ करमणूक म्हणून खेळले जातात. त्यांमध्ये हार-जीत हा बहुतांशी नशिबाचा भाग असतो. आधुनिक ब्रिज स्पर्धामध्ये मात्र एक डाव कमीत कमी दोनदा खेळला जातो. खेळलेली पानं एकत्र न मिसळता खेळाडू ती आपल्यापुढे शिस्तीनं मांडून ठेवतात. डाव संपल्यानंतर एका विशिष्ट प्रकारच्या खोक्यात (बोर्ड) प्रत्येक खेळाडूची पानं वेगळी ठेवून तो डाव जसाच्या तसा दुसऱ्या टेबलावर नेऊन ठेवतात. एकाच डावात दोन खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची तुलना करून प्रत्येकाला गुण मिळतात. एखाद्या ब्रिज लढतीचा निकाल कमीत कमी १० ते २० डावांतल्या गुणांची बेरीज करून ठरतो. ब्रिज स्पर्धेत अशा अनेक लढतींचा अंतर्भाव असतो. अशा प्रकारे नशिबाचा पत्ता कापल्यामुळे ब्रिज स्पर्धा म्हणजे प्रामुख्यानं तंत्र, कौशल्य आणि तयारी यांची कसोटी असते. या मजबूत ढाच्यामुळे ब्रिज खेळाडू जगातल्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेऊ शकतो आणि जिंकण्याची, किमानपक्षी चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगून तयारी करू शकतो. तसंच करमणूक आणि कसब यांच्या समसमासंयोगामुळे शिळोप्याचा खेळही खुसखुशीत होतो.
बऱ्याच ब्रिज स्पर्धा खुल्या असतात. काही राष्ट्रीय, राज्य पातळीवरच्या असतात. देशाचं प्रतिनिधित्व करणारा चमू निवडण्याकरिता विविध निकष वापरले जातात. जागतिक स्पर्धाचं चार वर्षांचं चक्र असतं. विषम अंकांतील (२०१७, १९, २१) वर्षांमध्ये राष्ट्रीय संघांना प्रथम विभागीय स्पर्धा खेळून सहभागाचे हक्क मिळवावे लागतात. चाराच्या पाढय़ातल्या वर्षांमध्ये राष्ट्रीय संघांची थेट स्पर्धा असते तर उर्वरित सम अंकांतील वर्षांतील स्पर्धा खुल्या पद्धतीनं होतात. कुमारांसाठीही जागतिक स्पर्धा असतात. गेल्या वर्षी शाळकरी मुलांकरिताही एक स्पर्धावजा शिबीर क्रोएशिया या देशात आयोजित करण्यात आलं होतं.
याशिवाय कित्येक खुल्या स्पर्धा जगभर व देशभर सातत्याने होत असतात. त्यामध्ये काही अमेरिकन, काही युरोपियन, चीनमध्ये होणारी येह बंधू चषक या मुख्य आहेत. भारतातली ‘एचसीएल’तर्फे भरविली जाणारी, साधारणपणे दोन कोटी रुपये बक्षीस रक्कम असलेली स्पर्धा हीसुद्धा आता जगातील अग्रगण्य स्पर्धा समजली जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठय़ा शहरांमध्ये अनेक स्पर्धा होतात. सांगली, रत्नाागिरी यांच्यासारख्या ठिकाणी एक तरी मोठी स्पर्धा दरवर्षी असते.
इंटरनेटद्वारे यातील कित्येक लढतींचं थेट प्रक्षेपण बघता येतं. यातल्या डावांचं विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी असतात. संगणकाच्या मदतीने आपणसुद्धा यातल्या खेळाचं मूल्यमापन करू शकतो. मात्र बुद्धिबळाच्या खेळात संगणक आता अजिंक्य आहे, तर ब्रिजच्या लोकप्रिय संगणक प्रणाली अजूनही चाचपडतच खेळतात. ब्रिजचा संगणकसंदर्भीय अभ्यास ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयात मोडतो.
(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)
panja@demicoma.com