News Flash

डाव मांडियेला : ब्रिज खेळाची तोंडओळख!

पत्त्यांचे विविध खेळ तसे जगभर घरोघरी खेळले जातात. १९०० पूर्वी ब्रिजसारखे पत्त्याचे खेळही जवळपास १००-१५० वर्षे तरी खेळले जायचे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. प्रकाश परांजपे

आबांना बुद्धीला चालना देईल असा विरंगुळा पाहिजे. ते अल्झायमरला घाबरतात. आजीला घरात चार माणसांचा राबता असेल तरच बरं वाटतं. पप्पांना व्यवसायाकरिता नवीन व्यक्तींची ओळख पाहिजे. अर्णवला दोन वर्षांत एखाद्या चांगल्या अमेरिकन विद्यापीठात कृत्रिम प्रज्ञा या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश पाहिजे आणि त्याकरिता त्याचा वैयक्तिक ठसा उमटेल अशा एखाद्या गोष्टीचा त्याला पाठपुरावा करायचा आहे. पिंकीला फक्त समाजीकरणात रस आहे आणि छोटय़ाला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर चमकायचंय (कुठल्या खेळात ते अजून ठरायचंय). आईचं म्हणणं एवढंच आहे की, घरातल्या सगळ्यांची तोंडं एका दिशेला असावीत, फोनमध्ये खुपसलेली नसावीत.

यातल्या प्रत्येकाचं समाधान करेल असा, निळ्या पडद्यापासून सुटका करणारा एक खेळ, विरंगुळा किंवा क्षेत्र खरं म्हटलं तर उपलब्ध आहे.. ते म्हणजे ब्रिज! हा खेळ तसा जगभर खेळला जाणारा. एक पत्त्यांचा जोड आणि चार टाळकी एवढय़ाच कच्च्या मालाची जरूर असलेला हा खेळ प्रमाणित नियमांच्या अनुसार, एकाच प्रकारच्या गुणमोजणीच्या पद्धतीने १५च्या वर देशांत खेळला जातो. या स्तंभामधून हा ब्रिज खेळ सोप्या पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

पत्त्यांचे विविध खेळ तसे जगभर घरोघरी खेळले जातात. १९०० पूर्वी ब्रिजसारखे पत्त्याचे खेळही जवळपास १००-१५० वर्षे तरी खेळले जायचे. या प्रत्येकाचे नियम आणि गुणमोजणी भिन्न भिन्न होती. १९२६ साली आजच्या स्वरूपातल्या ब्रिजचा जन्म झाला असं समजलं जातं. १९३०-४० या दशकात ब्रिज खेळ इतका लोकप्रिय झाला की एलाय कलबर्टसन हा अव्वल खेळाडू चक्क ग्राहकप्रिय वस्तूंच्या जाहिरातीमध्ये दिसू लागला. भारतातही मग ब्रिजचा यथावकाश प्रसार झाला.

१९३६च्या सुमारास मुंबईतील शेअर बाजार कोसळला, तेव्हा (फोर्ब्स मार्शल या आजच्या अग्रगण्य कंपनीचा संस्थापक) जे. एन. मार्शल हा पारशी उद्योगपती सर्वस्व गमावून बसला. पण पुढील तीन-चार वर्षे त्याने ब्रिज खेळामधील कौशल्याच्या जोरावर पैसे मिळवून घर चालवलं आणि नव्या उद्योगाची पायाभरणी केली. पत्त्याचा कुठलाही खेळ म्हणजे जुगार आणि शेअर बाजारातील व्यवहार म्हणजे गुंतवणूक अशा समजुती ठोकळेबाज आणि कालबा आहेत हाच याचा मथितार्थ.

आज जगभर खुल्या स्पर्धा, आंतरदेशीय स्पर्धा, युरोपियन, अमेरिकन, इंटरनेटवर होणाऱ्या स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या ब्रिज स्पर्धा दरवर्षी खेळल्या जातात. आशियाई स्पर्धामध्ये २०१८ साली ब्रिजचा समावेश करण्यात आला आणि भारताच्या खेळाडूंनी त्यात जोरदार यश मिळवलं.  पुढील लेखात आपण भारतातील स्पर्धा व इंटरनेटवरील ब्रिज खेळ यांची माहिती करून घेऊया.

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 2:00 am

Web Title: article on bridge game abn 97
Next Stories
1 कसोटीची कसोटी!
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : दुसऱ्या डावातही रहाणे अपयशी
3 IND vs SL : भारताच्या समस्येत वाढ, सरावादरम्यान विराटला दुखापत
Just Now!
X