03 June 2020

News Flash

डाव मांडियेला : डबलची भीती

वण्टक भातखंडेनी १ किलवर बोली लावून १२—१४ चित्रगुण दाखविले.

संग्रहित छायाचित्र

डॉ. प्रकाश परांजपे

गणा मास्तरच्या प्रश्नाचं उत्तर छोटूला नीटसं माहीत नव्हतं म्हणून त्याने आबांना विचारायचं ठरवलं. ब्रिजचा डाव संपल्यानंतर आबा फोनवर गर्क असतात, त्यामुळे त्याने बोर्डामध्ये डाव लावून ठेवला. बऱ्याच दिवसांनी जाधव सोसायटीत आले होते, त्यामुळे अनायासेच तो डाव खेळला गेला. मेनन-भातखंडे ४ बदामपर्यंत पोहोचल्यानंतर आबा काय बोलतील, याचं कुतूहल छोटूला होतं.

वण्टक भातखंडेनी १ किलवर बोली लावून १२—१४ चित्रगुण दाखविले. आबांकडे फक्त इस्पिक राजा राणी आणि किलवर राणी गुलाम, असे ८च चित्रगुण होते.  पण आबांनी पास म्हणण्याऐवजी २ इस्पिकची बोली लावली. मेनननं ‘डबल’ म्हटलं. छोटूने डबल ही बोली पूर्वीही ओझरती ऐकलेली होती, पण त्याचा नक्की अर्थ काय, हे त्याला माहीत नव्हतं.  मात्र सगळ्यात जास्त धक्का छोटूला बसला तो जाधवकाकांच्या पुढच्या ३ इस्पिक बोलीनं. त्यांच्याकडे इनमीन ४ चित्रगुण होते. किलवर राजा आणि इस्पिक गुलाम. त्यावर भातखंडे ४ बदाम बोलले आणि बाकी तिघांनी पास केल्याने ४ बदामाचा ठेका मुक्रर झाला.

आबांनी इस्पिक राजाने भवानी केली. इस्पिक एक्क्याने तो दस्त जिंकून भातखंडेने बदाम एक्का, राजा, राणी खेळून तीन फेऱ्यांत हुकूम काढले आणि चार चौकटचे दस्त वाजवून त्यावर हातातलं बदामाचं पान जाळलं. प-पू जोडीचे एकूण ११ दस्त झाले, आणि त्यांना शतकी ठेक्याचे ३०० अधिक तीस गुणिले पाच = १५० दस्तगुण असे एकूण ४५० गुण मिळाले.

छोटूने विचारलं, ‘‘आबा तुम्ही ४ इस्पिक का नाही बोललात? तुमचे ७ दस्त झाले असते आणि १५० मध्ये तोड झाली असती, आता त्यांना ४५० मिळाले ना?’’

आबांच्या ऐवजी  मेनननेच  त्याचं व्यवस्थित उत्तर दिलं. ‘‘छोटू, ४ इस्पिकला मी ‘डबल’ मारली असती आणि ३ कमी दस्त म्हणून आम्हाला ५०० मिळाले असते. -पहिल्या खाटय़ा दस्ताचे १००, दुसऱ्या आणि तिसऱ्या खाटय़ा दस्तांचे प्रत्येकी २००- असे. म्हणजे ४५०पेक्षा जास्त नुकसान झालं असतं आबांचं!’’ आता कुठे छोटूला ‘डबल’चा अर्थ लक्षात आला. ‘डबल’ नसताना कमी दस्त झाले तर ५०चा पाढा, पण डबल मारली तर १००-२००-२०० असा भरुदड द्यावा लागतो, म्हणजे कुणाला खोडसाळपणे प्रतिपक्षाच्या गुणसंख्येला कात्री लावता येत नाही. चौथ्या आणि त्यापुढच्या खाटय़ा दस्तांची प्रत्येकी ३००ची फोडणी लागते. ही अवस्था व्हल नसलेल्या जोडीची. व्हल असताना तर पहिल्या खाटय़ा दस्ताचे २००, पुढच्यांचे प्रत्येकी ३०० अशा भाजणीने नुकसान होऊ शकतं.

गुणमोजणी या पद्धतीमुळे वाह्यत बोली टळतात हे छोटूच्या लक्षात आलं. मात्र छोटूच्या पुढे तीन नवीन प्रश्न उभे राहिले. आबा २ इस्पिक का बोलले, मेननकाकांनी डबल का मारली आणि जाधवकाका तरीही ३ इस्पिक का बोलले?

https://www.youtube.com/channel/UC4jcD2_X7oCi5NNQANr3A6Q

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 2:00 am

Web Title: article on bridge game technique abn 97 2
Next Stories
1 फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी, La Liga स्पर्धेला स्पेन सरकारची मंजुरी
2 “हातातलं सँडविच ठेवून मी…”; रैनाने सांगितला पाक विरुद्धच्या सामन्यातील धोनीचा किस्सा
3 भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन इतक्यात शक्य नाही – क्रीडामंत्री किरेन रिजीजू
Just Now!
X