धनंजय रिसोडकर

भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याच्याकडून सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे, त्यात नेमबाजीचा क्रमांक अव्वल असल्याचे मानले जाते. प्रस्थापित भारतीय नेमबाजांकडे असलेली सर्वोच्च प्रतिभा आणि त्यापेक्षाही कांकणभर सरस ठरत असलेल्या युवा नेमबाजांच्या अचूकतेचा दबदबा आता जगात निर्माण झाला आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपासून नवी दिल्लीमध्ये सुरू होणारी जागतिक नेमबाजी स्पर्धा ही भारतीय नेमबाजांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने सर्वाधिक अनुकूल ‘लक्ष्य’ मानले जात आहे. या स्पर्धेत भारताला ऑलिम्पिकमधील किमान चार ते पाच जागांची निश्चिती करता येऊ शकेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

भारताला नेमबाजीतील पहिले पदक २००४मध्ये तत्कालीन लष्करी अधिकारी आणि विद्यमान केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी जिंकून दिले होते. त्या रौप्यपदकानंतर पुढच्या म्हणजे २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला होता. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिले सुवर्णपदक नेमबाज बिंद्राने मिळवून दिले होते. त्यानंतर २०१२ मध्ये लष्करी अधिकारी विजय कुमार आणि गगन नारंग यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले होते. मात्र २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वच नेमबाजांचा नेम हुकला आणि भारताला नेमबाजीत एकही पदक मिळू शकले नव्हते. मागील दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना ‘सुवर्णलक्ष्य’ साधण्यात अपयश आले आहे. त्यामुळे २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये गेल्या ऑलिम्पिकची उणीवदेखील भरून काढण्याचा नेमबाजांचा प्रयत्न राहणार आहे. या ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी चार विश्वचषक स्पर्धा उपलब्ध आहेत. त्यातील पहिलीच विश्वचषक स्पर्धा दिल्लीत असून, यात भारतीय नेमबाज दमदार कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भारताच्या अपूर्वी चंडेला आणि अंजूम मुद्गिल यांनी गेल्या वर्षीच दोन ऑलिम्पिक स्थाने निश्चित केली आहेत. त्यामुळे या स्पर्धेत भारताला आणखी स्थाने निश्चित करण्याची संधी चालून आली असल्याचे मानले जात आहे. त्यातही भारताकडून हिना सिधू, मनू भाकर, राही सरनोबत या पिस्तूल प्रकारात आणि तेजस्विनी सावंतला रायफल प्रकारात ऑलिम्पिक स्थान निश्चित करता येऊ शकेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. पुरुष गटामध्ये युवा सौरभ चौधरीसह अभिषेक वर्मा, दिव्यांश सिंग पनवर यांच्याबाबत आशा आहेत.

मनू आणि सौरभ  पदकांचे दावेदार

मनू आणि सौरभ यांनी गेल्या दोन वर्षांत दाखवलेली प्रगती ही नेत्रदीपक आहे. त्यामुळे केवळ ऑलिम्पिकमधील स्थाननिश्चिती मिळवण्यासह ते भारताला पुन्हा वैयक्तिक सुवर्ण मिळवून देऊ शकतात. त्यामुळेच त्यांचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले तर त्यांना पुढील तयारीकडे गांभीर्याने लक्ष देता येईल. अभिनवच्या रूपाने सर्वोत्तम स्तराचा मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष नेमबाजीचा जाणकार व क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड खेळाडूंच्या प्रत्येक आवश्यकतेला पूर्ण करण्यावर भर देत आहेत.

अनुभवी आणि युवकांमध्ये चुरस

भारताचे अनुभवी नेमबाज आणि युवा नेमबाज यांच्यात ऑलिम्पिकमधील स्थाननिश्चितीसाठी खरी चुरस दिसून येणार आहे. मोठय़ा स्पर्धामध्ये दबाव झुगारण्यासाठी अनुभव खूप मोलाचा असतो. त्यामुळे फारसा अनुभव गाठीशी नसतानाही गेल्या दोन वर्षांपासून झळाळणारे भारताचे मनू, सौरभसारखे युवा नेमबाज डळमळतात की बाजी मारतात, त्याकडेदेखील क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.

नेमबाजीत एकापाठोपाठ एक युवा नेमबाज चमकत असल्याने नेमबाजीच्या क्षेत्रात प्रचंड चैतन्य आहे. त्यामुळे येत्या विश्वचषकात मला भारतीय संघाकडून आणि विशेषत्वे युवा नेमबाजांकडून अत्यंत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकमधील चार-पाच किंवा त्यापेक्षाही अधिक जागा विश्वचषकात निश्चित करू, अशी अपेक्षा आहे.

– जसपाल राणा, भारताचे नेमबाजी प्रशिक्षक