क्रिकेटविश्वामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’च्या मुहूर्तावर आणि नाताळच्या सुट्टीच्या जल्लोषात अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा थरार साऱ्यांना अनुभवता येणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील तिन्ही सामने जिंकत विजयी आघाडी घेतली असून आता निर्भेळ यश मिळवण्याकडे त्यांचा कल असेल. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने मालिका गमावलेली असली तरी हा सामना जिंकून त्यांना मालिकेतील पराभवाचा दुष्काळ संपवता येईल.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही महत्त्वाच्या आघाडींवर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत मालिकेत वर्चस्व गाजवले आहे. ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही सलामीवीरांना चांगला सूर गवसला असून शेन वॉटसनही चांगल्या फॉर्मात आहे. मधल्या फळीची यशस्वीपणे धुरा कर्णधार मायकेल क्लार्क आणि स्टिव्हन स्मिथ वाहताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सन भन्नाट फॉर्मात असून त्याला पीटर सिडल आणि रयान हॅरिस यांची उपयुक्त साथ मिळत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात या सामन्यासाठी कोणताही बदल होणार नाही.
ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड आणि पर्थमधील मानहानीकारक पराभव आणि अनुभवी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने घेतलेली निवृत्ती इंग्लंडसाठी नक्कीच मनोबल खच्चीकरण करणारी असेल. फलंदाजीमध्ये इंग्लंडच्या एकाही खेळाडूला सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, केव्हिन पीटरसन यांच्यावर अधिक दडपण असेल. गेल्या सामन्यात बेन स्टोक्सने शतक झळकावल्यामुळे त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा वाढल्या असतील. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन आणि टिम ब्रेसनन यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. स्वानच्या जागी संघात स्थान मिळवलेला फिरकीपटू माँटी पनेसार काय कमाल दाखवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. या सामन्यात यष्टीरक्षक मॅट प्रायरच्या जागी जॉनी बेअरस्टोव्हला संधी देण्यात आली आहे.
*  संघ – ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), ख्रिस रॉजर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, स्टिव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, रयान हॅरिस आणि नॅथन लिऑन.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मायकेल कार्बेरी, जो रूट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टोव्ह, स्टुअर्ट ब्रॉड, टिम ब्रेसनन, जेम्स अँडरसन आणि माँटी पनेसार.
*  सामन्याची वेळ : सकाळी १०. ३० वाजल्यापासून.
*  थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट वाहिनीवर.