* इंग्लंडचा पहिला डाव २१५ धावांत गारद
* पीटर सिडलचे पाच बळी
* ऑस्ट्रेलिया दिवसअखेर ४ बाद ७५
पीटर सिडलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्याच कसोटीत इंग्लंडचा डाव २१५ धावांत गुंडाळला. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची ४ बाद ७५ अशी अवस्था झाली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला जेम्स पॅटिन्सनने १३ धावांवर बाद केले. जो रुट आणि जोनाथन ट्रॉट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पीटर सिडलने रुटला त्रिफळाचीत केले. केव्हिन पीटरसन (१४) आणि जोनाथन ट्रॉट(४८)ला झटपट बाद करत सिडलने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. इयान बेललाही त्रिफळाचीत करत सिडलने इंग्लंडच्या धावगतीला वेसण घातली. यष्टीरक्षक फलंदाज मॅट प्रॉयरला एका धावेवर बाद करत सिडलने पाचव्या बळीची नोंद केली.
जॉनी बेअरस्टोने ३७ धावा करत एकाकी झुंज दिली मात्र त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळू शकली नाही. इंग्लंडचा डाव २१५ धावांतच आटोपला. सिडलने सर्वाधिक ५ बळी टिपले. जेम्स पॅटिन्सनने ३ तर मिचेल स्टार्कने २ बळी घेत सिडलला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. शेन वॉटसन १३ धावा काढून तंबूत परतला. इड कोवानला तर भोपळाही फोडता आला नाही. रॉजर्स आणि क्लार्कलाही तंबूत धाडत एँडरसनने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्हन स्मिथ ३८ तर फिलीप ह्य़ूज ७ धावांवर खेळत आहे.