माया आक्रे-मेहेर – अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू

सामन्यात कोणतीही परिस्थिती येते, तेव्हा ती कशी हाताळायची हे आपण अनुभवातून शिकत असतो. परंतु आशियाई क्रीडा स्पध्रेतील भारतीय पुरुष संघाचा उपांत्य सामना आणि महिलांचा अंतिम सामना पाहिल्यानंतर हे प्राथमिक धडे आपण पुन्हा नीट गिरवण्याची आवश्यकता असल्याचे प्रत्ययास येते. संघातील मध्यरक्षण आणि सांघिक समन्वय याचा अभाव प्रकर्षांने दिसून आला. पंचांच्या निर्णयाचा फटका बसला, असे मला वाटत नाही. इराणी संघ भारतापेक्षा सर्वार्थाने सरस होता.

आशियाई क्रीडा स्पध्रेच्या व्यासपीठावर खेळण्यासाठी याआधी पुरेसा सराव संघाने केला होता. मात्र तरीही हा महिला संघ दडपणाखाली खेळताना जाणवत होता. एकंदर चढाया आणि पकडी पाहिल्यानंतर कुणाकडून आशा ठेवाव्यात, हेच कळत नव्हते. इराणच्या संघाविरुद्ध आक्रमक पद्धतीने सामना करायची आवश्यकता होती. खेळाडूंच्या चुकीमुळे आपण काही गुण गमावले. संघाकडे आघाडी नसल्याचे गांभीर्य असायला हवे होते.

चढाईत एका पद्धतीने बाद झाल्यानंतर पुढच्या चढाईला त्याचे भान महिला खेळाडूंनी राखायला हवे होते. महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटे आणि सायली केरिपाळे यांच्याकडून मला मोठय़ा अपेक्षा होत्या. सायली ही चांगली खेळाडू आहे. चढाईत गुण मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी चढाईपटूला रोखण्याचा प्रयत्न करण्याची तिला मुळीच आवश्यकता नव्हती. आशियाईच्या व्यासपीठावर खेळाडूंनी कौशल्य आणि रग खऱ्या अर्थाने दाखवायला हवी होती.